४ डिसेंबर २०२३ च्या नौसेना दिनी लोकार्पण प्रस्तावित
कल्याण दि. १० नोव्हेंबर :
कल्याणच्या खाडी किनारी प्रस्तावित असणाऱ्या नौदल संग्रहालयाच्या कामाने आता चांगलाच वेग घेतलेला दिसत आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या सल्लागार समितीचे प्रमुख असलेल्या व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) सुनिल भोकरे यांनी नौदल संग्रहालयाच्या जागेची आज सकाळी पाहणी केली. त्यासोबत त्यांनी प्रस्तावित स्मारकाच्या प्रतिकृतीचेही अवलोकन केले.
छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहास आणि दूरदृष्टीचे प्रतिक म्हणून स्वराज्याच्या पहिल्या आरमाराकडे पाहिले जाते. शिवाजी महाराजांचा हा पराक्रमी इतिहास कल्याणच्या खाडी किनारी उभारल्या जाणाऱ्या नौदल संग्रहालयामधून पुन्हा एकदा जिवंत केला जाणार आहे. संग्रहालयाच्या या कामाने आता चांगलाच वेग घेतला असून गेल्याच आठवड्यात युद्धनौका स्मारक म्हणून कल्याणात आणण्याबाबत भारतीय नौदलाशी करार करण्यात आला आहे. तर नौदल संग्रहालय प्रकल्पाच्या सल्लागार समितीचे प्रमुख असलेल्या व्हाइस ॲडमिरल (निवृत्त) सुनिल भोकरे यांनी आज दुर्गाडी गणेश घाटावर भेट देत पाहणी केली. नौदल संग्रहालयासाठी निवडण्यात आलेली ही जागा अत्यंत सुंदर असल्याचे सांगत त्यामुळे आपल्या शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासह आपला नौदलाचा इतिहास जिवंत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, महापालिका सचिव संजय जाधव, स्मार्ट सिटीचे तरुण जुनेजा, हेरिटेज मॅनेजमेंट कन्सल्टंट सचिन सावंत आदी अधिकारी उपस्थित होते.
मराठा नौदलाचा इतिहास आणि स्वतंत्र भारताच्या भारतीय नौसेनेचा इतिहास..
खाडी किनारी बनणाऱ्या या नौदल संग्रहालयामध्ये छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा नौदलाचा इतिहास आणि स्वतंत्र भारताच्या भारतीय नौसेनेचा इतिहास असणार आहे. पोर्तुगीज हे कल्याणच्या नदीच्या पुढच्या विभागात काम करत होते. आपल्याला सिद्दीच्या विरोधात लढायचे आहे असे सांगून छ्त्रपती शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांकडून इंजिनिअरिंग आणि जहाज बांधणी या दोन्ही स्तरांवर मदत मिळवली आणि नंतर स्वतःच्या आरमाराची सुरुवात केल्याची माहिती हेरिटेज मॅनेजमेंट कन्सल्टंट सचिन सावंत यांनी एलएनएनशी बोलताना दिली.
अरिहंत पाणबुडीशी मिळत्या जुळत्या आकाराच्या वास्तूत असणार संग्रहालय…
१७ व्या शतकात स्वतःच्या नौदलाची बांधणी करत छत्रपती शिवाजी महाराजांनी आत्मनिर्भरता दाखवली होती. भारतीय नौदलही तशाच प्रकारची आत्मनिर्भरता अवलंब करत आहे. भारताच्या स्वतःच्या बांधणीच्या युद्धनौकेपैकी सर्वात शक्तिशाली अरिहंत पाणबुडीला डोळ्यासमोर ठेवून त्याच्याशी मिळत्या जुळत्या आकाराच्या वास्तूत मराठा आरमार आणि भारतीय नौसेनेचा इतिहास मांडला जाणार आहे. संपूर्ण भारतीय नौसेनेने प्रसिद्ध केलेला इतिहास चित्र, शिल्प, डिजिटल, मॉडेल्स, स्वरूपात इतिहास जागृत केला जाणार. या संग्रहालयामधील प्रत्येक कंटेंट भारतीय नौसेनेच्या अधिकृत प्रकाशनांमधून घेण्यात आल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले. या सर्व प्रकल्पाची मुळ संकल्पना तत्कालीन आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी मांडली आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी या संग्रहालयाचे लोकार्पण प्रस्तावित…
भारतीय नौसेनेने ४ डिसेंबर १९७१ मध्ये पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला करून संपूर्ण बंदर उध्वस्त केले होते आणि पूर्व पाकिस्तानातून पश्चिम पाकिस्तानात जाणारी जलवाहतूक पूर्णपणे बंद केली होती. ज्याचा परिणाम म्हणून जमिनीवर पश्चिम पाकिस्तानला कोणतीही मदत मिळू शकली नाही. ज्यामुळे भारतीय लष्कराने १९७१ चे युद्ध एकहाती जिंकल्याचा आपल्याला संदर्भ मिळतो. त्या दिवसाचे स्मरण म्हणून भारतीय नौसेना ४ डिसेंबर रोजी नौसेना दिन साजरा करतो. ४ डिसेंबर २०२३ रोजी या संग्रहालयाचे लोकार्पण प्रस्तावित करण्यात आल्याची माहितीही हेरिटेज मॅनेजमेंट कन्सल्टंट सचिन सावंत यांनी दिली.