Home ठळक बातम्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर कल्याणातही जल्लोष

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर कल्याणातही जल्लोष

कल्याण दि. 9 नोव्हेंबर 

गेल्या 3 महिन्यांहून अधिक काळ जेलमध्ये असणाऱ्या खासदार संजय राऊत यांची आज कोर्टाने जामिनावर मुक्तता केली. त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून मुंबईसह ठिकठिकाणी आनंदोत्सव सुरू झाला आहे. कल्याणातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

पत्रा चाळप्रकरणी ईडीकडून अटक झालेले शिवसेना नेते (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत गेल्या 100 दिवसांपासून जेलमध्ये होते. या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने संजय राऊत यांना आज दुपारी जामीन मंजूर केला. आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दुपारपासून सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली.

संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास खासदार संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यानंतर सगळीकडेच जल्लोष सुरू झाला आहे. कल्याणातही तेच चित्र दिसून येत असून शिवसेना जिंदाबाद, पन्नास खोके, कोण आला रे कोण आला आदी घोषणांच्या गजरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला.

यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अल्ताफ शेख, कल्याण जिल्हाप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास, रवी कपोते, रमेश जाधव, अनिल डेरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खा. संजय राऊत यांच्या सुटकेने महाराष्ट्रात झंजावात तयार होणार – शहरप्रमुख सचिन बासरे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची सुटका होण्यासाठी काहीसा विलंब झाला असला तरी सत्यमेव जयते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र आपल्या दौऱ्यानी पिंजून काढला आहे. खासदार संजय राऊत यांच्या सुटकेनंतर आता संपूर्ण राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण होण्यासह झंजावत तयार होईल असा विश्वास यावेळी शहर प्रमुख सचिन बासरे यांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच त्यांनी ई डी, सीबीआय या दडपशाही मार्गाऐवजी लोकशाही मार्गाने आमच्याशी लढावे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा