Home ठळक बातम्या डोंबिवलीत 12 ते 19 डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन

डोंबिवलीत 12 ते 19 डिसेंबरदरम्यान अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे आयोजन

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन

डोंबिवली दि.4 डिसेंबर :
डोंबिवली शहराची एक वेगळी ओळख ठरलेला सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आगरी महोत्सव. कोवीडमूळे गेले दोन वर्ष होऊ न शकलेल्या या महोत्सवाचे यंदा 12 ते 19 डिसेंबर दरम्यान अतिशय दणक्यात आयोजन करण्यात आल्याची माहिती आगरी महोत्सव समितीचे प्रमुख गुलाब वझे यांनी दिली.

या वर्षीचा हा 18 वा महोत्सव असून त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कै. ह.भ. प. सावळाराम महाराज संकुलात उद्घाटन केले जाणार आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दोन वर्षांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर साजरा होणा-या या महोत्सवात आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या महोत्सवाला भेट देणा-या आबालवृद्ध, महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून महोत्सव संयोजन समितीने अत्यंत नियोजनबद अशी कार्यक्रमांची आखणी केली आहे.

तर या महोत्सवाचे आकर्षण असेल तो लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जीवनकार्याचा पट उलगडून दाखवणारा स्टॉल. या स्टॉलच्या माध्यमातून दिबांनी केलेलं कार्य नव्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर युवा पिढीला आपल्या पूर्वीच्या सामाजिक जीवन पद्धतीची माहिती करून देणारा स्टॉलही उभारण्यात येणार असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले.

त्यासोबतच मराठी भाषा – मराठी शाळा वाचवा’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून त्यात प्रकाश पायगुडे आणि माजी आमदार बाळाराम पाटील आपली मते मांडणार आहेत. तर ‘भूमिपुत्रांचे भवितव्य’ या विषयावर केंद्रीय मंत्री कपिल पाटील, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, दशरथ पाटील आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ जे.डी. तांडेल हे आपले मनोगत व्यक्त करतील. मराठी युवकांना उद्योजकतेचे धडे देणाऱ्या ‘चला तरुणांनो उद्योजक बनूया’ या विषयावर प्रा.नामदेवराव जाधव मार्गदर्शन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

याशिवाय महोत्सवातील एक दिवस महिला सन्मानार्थ राखून ठेवण्यात आला असून त्यादिवशी सर्व व्यवस्थापन महिलांकडे सोपवण्यात येणार आहे. महिलांचा आध्यात्मिक क्षेत्रातील वाढता सहभाग लक्षात घेऊन हरिपाठाचे आयोजन, नामवंत संगीत भजनाचा ज्ञानबा-तूकाराम कार्यक्रमाचे त्याचप्रमाणे महिलांसाठी “यशस्वी आणि आनंदी जीवनाची सूत्रे या विषयावरील चर्चासत्र घेतले जाणार असल्याचे गुलाब वझे यांनी सांगितले.

मागील लेखसध्याची आपली शिक्षण व्यवस्था अपडेट करण्याची गरज – आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त लेखक चेतन भगत
पुढील लेखआजपासून कल्याण स्टेशनऐवजी केडीएमटी, एनएमएमटी बसेस या नविन ठिकाणावरून सुटण्यास सुरुवात

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा