Home ठळक बातम्या कल्याणातील सुप्रसिद्ध तबला ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; लता दिदिंसोबत केले...

कल्याणातील सुप्रसिद्ध तबला ढोलकी वादक अशोक कदम यांचे निधन; लता दिदिंसोबत केले 25 वर्षे काम

 

कल्याण दि.7 एप्रिल :
आपल्या तबला आणि ढोलकी वादनाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कल्याणातील अशोक कदम यांचे हृदय विकाराच्या धक्क्याने काल रात्री निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि आदित्य – ओंकार ही दोन मुले आहेत. गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी तब्बल 25 वर्षे काम केले होते. (Ashok Kadam, a well known tabla player from Kalyan passed away; Worked with Lata mangeshakr for 25 years)

अशोक कदम यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने शून्यातून आपले विश्व निर्माण केले होते. मूळचे शहापूर येथील असणारे कदम कुटुंबियांमध्ये मुळातच संगीत क्षेत्राची गोडी. त्यांच्या वडीलांपासून हा कलेचा वारसा अशोक आणि त्यांचे बंधू स्व. मनोहर यांच्यामध्ये उतरला. स्व. मनोहर कदम हे उत्तम सनईवादक म्हणून परिचित होते. तर अशोक कदम यांनी तबला, ढोलकी, पखवाज वादनात निष्णात. या कौशल्यामुळेच भारतरत्न स्व. लता मंगेशकर यांच्यासोबत अशोक कदम यांनी थोडे थोडके नव्हे तर तब्बल 25 वर्षे काम केले. देश – परदेशात झालेल्या लता दिदिंच्या असंख्य सोहळ्यात अशोक कदम यांनी तबला वादन केले होते.

संगीत हाच ध्यास आणि संगीत हाच श्वास हा मंत्र त्यांनी अखेरर्यंत जपला. कल्याणातही चांगल्या दर्जाचे संगीत साधना केंद्र असावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी प्रथमेश म्युजिक अकादमीची स्थापना केली होती. ज्यातून त्यांची मुलं आदित्य आणि ओंकार ही देखील त्यांचा वारसा पुढे चालवत आहेत.

एवढ्या उच्च पदावर पोहोचूनही पाय मात्र नेहमीच जमिनीवर ठेऊन वावरणाऱ्या अशोक कदम यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनावर संगीत क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच कल्याणकर नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

अशा या उत्तुंग कलाकाराला टीम एल एन एन कडून भावपूर्ण श्रद्धांजली…

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा