Home नागरी समस्या खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्ह्याला शाप – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्ह्याला शाप – केंद्रीय मंत्री कपिल पाटील

शहरातील बकालपणाबाबत प्रशासनाला विचारणार जाब

कल्याण दि.1 ऑक्टोबर :
केवळ एक नाही तर अनेक असे प्रकल्प आहेत की ज्यावरून खराब कंत्राटदारांचा ठाणे जिल्ह्याला शाप असल्याचे स्पष्ट होत असल्याचे उद्विग्न उद्गार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी काढले. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आयोजित स्वच्छता अभियानासाठी ते कल्याणात आले होते. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांनी शहरांच्या बकालपणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

शहरातील प्रश्नांबाबत केडीएमसी प्रशासनाला जाब विचारणार…

शहरातील रस्त्यांची कामे असो की स्वच्छतेची की आणखी कोणती. ही कामे चांगली होण्यासाठी नागरिकांनीही एक दबावगट तयार केला पाहिजे. ज्यातून शहरात होणाऱ्या कामांवर लक्ष आणि प्रशासनावर त्याचा अंकुश राहू शकेल. तर शहरातील बकालपणाबाबत आपण महापालिका अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घालणार नसून लवकरच या प्रश्नांबाबत केडीएमसी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

दुर्गाडी येथील स्वच्छता अभियानात झाले सहभागी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या स्वच्छता पंधरवड्याअंतर्गत केडीएमसी प्रशासनातर्फे दुर्गाडी किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले. त्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनीही आपल्या हातात झाडू घेऊन साफ सफाई केल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची विकास होत असताना तो स्वच्छही असला पाहिजे.

तर कल्याण राज्यातील सर्वात स्वच्छ शहर होईल…
मात्र केवळ स्वच्छता पंधरवड्यापुरता हे स्वच्छता अभियान न राबवता दररोज झाले पाहिजे. शहरातील नागरिकांनीही स्वच्छतेची शपथ घेऊन त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला तर राज्यातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कल्याण अग्रस्थान पटकावेल असा विश्वासही कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

या स्वच्छता अभियानात माजी आमदार नरेंद्र पवार, शिवसेनेचे शहरप्रमूख रवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष वरुण पाटील, केडीएमसीचे ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. रुपिंदर कौर, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त अतुल पाटील, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, माहिती जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव यांच्यासह अनेक अधिकारी आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा