Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे शानदार सोहळ्यात अनावरण

कल्याण पूर्वेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे शानदार सोहळ्यात अनावरण

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण , डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण सोहळ्यासाठी लोटला हजारोंचा जनसागर

कल्याण दि.१० मार्च :

कल्याणमध्ये उभारण्यात आलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे स्मारक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, एक ऊर्जा देत राहील अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. निमित्त होते ते कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये साकारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शानदार सोहळ्यात अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याप्रमाणेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शायरी अंदाजमध्ये आपले मनोगत व्यक्त केले.

बाबासाहेब एवढे शिकले की पुस्तक हे त्यांचा आयुष्य होतं आजही त्यांच्या कार्याचा विचारांचा जगभर अभ्यास केला जातो हे अभिमानास्पद आहे. त्यांनी मानव मुक्तीचा समानतेचा लढा उभा केला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं केलेलं कार्य पूर्ण विश्वाला मार्गदर्शक असेच राहिले आहे. आणि आपली जी घटना आहे ती जगातली सर्वोत्तम भारताची घटना, बाबासाहेबांनी लिहिली आहे. त्याच्यावरच आपल्या देशाचा कारभार आपल्या राज्याचा कारभार सुरू असल्याचे सांगत ” हम भी है बाबासाहेब के बंदे,नाम है मेरा एकनाथ शिंदे” अशा शायराना अंदाजमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा यशस्वी पाठपुरावा…
कल्याण पूर्व येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य पुतळा असावा अशी मागणी येथील गेल्या 15 वर्षांपासून केली जात होती. नागरिकांच्या याच मागणीचा विचार साधारणपणें 3 वर्षांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्मारकाच्या उभारणीचे काम हाती घेतले. मात्र यासाठी अस्तित्वात असणारी जागा दुसऱ्या प्रयोजनासाठी आरक्षित असल्याने शासकीय प्रक्रिया करून जागेच्या आरक्षणात फेरबदल करणे गरजेचे होते. आणि राज्य सरकारनेही अतिशय विक्रमी वेळेत हे आरक्षणातील फेरबदल करून दिले. तसेच हे स्मारक अधिक भव्य पद्धतीने उभारावे यासाठी विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अतिरिक्त ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नगरविकास विभागाकडूनही यासाठी तात्काळ मंजुरी देण्यात आली. आणि त्यानंतर सर्व कायदेशीर बाबींच्या पूर्ततेनंतर आज हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.

केवळ स्मारक नव्हे तर असणार ज्ञान केंद्र…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले की आपसूकच डोळ्यांसमोर येते ती प्रचंड बुद्धीमत्ता आणि ज्ञानाचा अथांग सागर. आणि नेमकी हीच गोष्ट डोळ्यांसमोर ठेवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून या स्मारकाची उभारणी केली जात आहे. केडीएमसीच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरामध्ये १ हजार ३०० चौरस मीटर जागेवर भव्य स्मारक उभारले जात आहे. ज्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ चित्रांचे प्रदर्शन, स्मारकांच्या भिंतींवर ३ डी चित्र, ग्रंथालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो आणि सांस्कृतिक समारंभासाठी स्मारक परिसरात भव्य सभागृह अशी संरचना आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकविषयी बोलताना खासदार डॉ श्रीकांत शिंदे भावूक…
बाबासाहेबांचे स्मारक नाही तर हे एक ऊर्जाकेंद्र असणार आहे. आम्हाला जर का अधिक जास्त जागा मिळाली असती तर देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठे स्मारक आपण उभारले असते. याठिकाणी आलेल्या व्यक्तींनी बाबासाहेबांच्या या उत्तुंग व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घ्यावी आणि अशा उद्देशाने हे स्मारक साकारण्यात आले आहे. आपण जे जे शब्द दिले तो पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण गेल्या दहा वर्षांत प्रयत्न केला. आपल्यासाठी हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रकल्प होता. हे स्मारक केवळ इमारत नाहीये, तर आपल्या पुढच्या पिढीला घडवणारे जिवंत स्मारक उभे राहिले आहे. तर भविष्यात यापेक्षा मोठे स्मारक आपण उभे करू. तर कल्याण पूर्वेच्या प्रवेश द्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण उभा करू असा विश्वासही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान स्मारक समितीचे अध्यक्ष अण्णा रोकडे, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दिपेश म्हात्रे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी निलेश शिंदे यांच्यासह हजारोच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा