Home ठळक बातम्या 5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून...

5 दशकांपासून मृत्यूला आस्मान : कल्याणच्या या मृत्युंजयाची इंडिया, एलाईट बुककडून दखल

हा गंभीर आजार असूनही केलीये मृत्यूवर मात

कल्याण दि.11 मार्च :
व्हेंट्रीक्युलर सेप्टल डिफेक्ट किंवा आयसनमेंगर (हृदयाला छिद्र असणे) ही गंभीर आजाराची नाव वाचणं जितकं कठीण आहे तितकंच हा आजार झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे वाचणेही तितकेच कठीण. कारण ज्या आजारांवर अद्याप वैद्यकीय क्षेत्राला कोणतेही औषध – इलाज सापडलेले नाही त्यापैकी हा एक आजार. मात्र कल्याणातील एक असा मृत्युंजय आहे, ज्याने गेल्या 5 दशकांपासून या आजारावर मात केली आहे. या मेडीकल मिरॅकलची इंडिया बुक आणि एलाईट बुकने दखल घेत हा अतिगंभीर आजार असूनही सर्वाधिक वर्षे जगणारी व्यक्ती म्हणून त्यांचा सन्मान केला आहे.

हृदयाला छिद्र असल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये समोर…
मुकुल गरे असे या मृत्युंजयाचे नाव असून ते कल्याण पश्चिमेच्या ऋतू कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहे. खेळताना खूप जास्त दम लागतो म्हणून वयाच्या सोळाव्या वर्षी मुकुल गरे यांनी वैद्यकीय तपासणी केली आणि आलेले रिपोर्ट पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांच्या हृदयाला छिद्र असल्याचे (Eisenmenger – Ventricular Septal Defect – VSD) वैद्यकीय तपासणीमध्ये समोर आले. हृदयाच्या या छिद्रामुळे शरीरात शुद्ध ऑक्सिजन तयार होण्यास अडचण निर्माण होते. या आजारावर उपचार शक्य नसल्याने मुकुल पुढील २ वर्षे जगू शकेल असे निदान डॉक्टरांनी केले. आणि मग तेव्हापासून मुकुल गरे यांचा सुरू झाला मृत्यूलाच आस्मान दाखवण्याचा प्रेरणादायी प्रवास.

ॲनिमल चित्रपटातही साकारली आहे भूमिका…
सुरुवातीच्या काळात मृत्यूच्या विचारानेच ते प्रत्येक क्षण त्याच्याच सावटाखाली जगत होते. परंतु डॉक्टरांनी दिलेली दोन वर्षांची मुदत संपली आणि मग सुरू झाले ते मृत्यू आणि मुकुल यांच्यातील द्वंद्वयुद्ध. आणि जबरदस्त इच्छाशक्ती, जिद्द आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर त्यांनी स्वतःला मृत्यूच्या दाढेतूनच बाहेर काढले नाही तर नकळतपणे इतरांसमोर जगण्याचा मोठा आदर्शही उभा केला आहे. गेल्या दोन दशकात त्यांनी पत्रकारिता, अभिनय, मेडीकल पीआर आदी विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ॲनिमल चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारली आहे. तर वयाच्या चाळीशीत लग्नाच्या बेडीत अडकलेल्या मुकुल यांची पत्नी उषा या मुंबई महापालिकेत रसायन शास्त्रज्ञ असून मुलगा अथर्व हा कॉम्प्युटर इंजिनियर आहे.

दररोज 5-6 तास कृत्रिम ऑक्सिजन घेऊनच घराबाहेर…
मृत्यूशी त्यांचा आजही तितकाच कडवा संघर्ष सुरूच आहे. दररोज 5 – 6 तास कृत्रिम ऑक्सिजन घेऊनच त्यांना घराबाहेर पडावे लागत आहे. परंतु या इतक्या प्रचंड संघर्षाचा साधा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत नाही. इतकी सकारात्मक ऊर्जा आणि जगण्याची प्रेरणा त्यांना भेटून मिळते. त्यांचा भगवान श्री कृष्ण आणि त्यांनी सांगितलेल्या भगवत गीतेवर प्रचंड श्रद्धा असून त्यामुळेच आपण थेट मृत्यूलाच परावृत्त करू शकलो. तसेच ही लढाई यशस्वी होण्यामध्ये आपल्या कुटुंबीयांचाही तितकाच मोलाचा वाटा असल्याचे ते सांगतात.

असामान्य लढ्याचा प्रेरणादायी, उर्जादायी प्रवास
मुकुल गरे यांचा हा केवळ जीवनपट नाहीये तर एका सामान्य व्यक्तीने दिलेल्या असामान्य लढ्याचा प्रेरणादायी, उर्जादायी प्रवास आहे. जो समजल्यानंतर त्यांच्या दुःखापुढे आपली स्वतःची दुःखे, अडचणी, समस्या, प्रश्न सर्व काही अत्यंत खुजे वाटू लागतील. आणि त्याचीच दखल घेत नामांकित इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच एलाईट बुक ऑफ रेकॉर्डनं त्यांना गौरवलं आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा