Home ठळक बातम्या उद्धव ठाकरे तुम्हीच खरे गद्दार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे तुम्हीच खरे गद्दार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई महापालिकेतील १२ हजार ५०० कोटींप्रकरणी एसआयटीची स्थापना

कल्याण दि.२० जून :
भाजप आणि शिवसेनेच्या युतीला (Bjp Shivsena alliance) महाराष्ट्रतील जनतेने पूर्ण बहुमत दिले. मात्र निवडणूक झाली आणि तुमची नियत बदलली. आणि मग खुर्चीकरता तुम्ही विचारांशी सौदा केला. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात गद्दारी कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी केल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM DEVENDRA FADANVIS) यांनी कल्याणात केला. तसेच मुंबई महापालिकेत १२ हजार ५०० कोटींचा अपहार झाल्याचे कॅगने (BMC) सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटी (SIT) स्थापन केल्याचा गौप्यस्फोटही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

मोदी @९ या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत कल्याण पश्चिमेच्या वासुदेव बळवंत फडके मैदानात झालेल्या जाहीर सभेमध्ये ते बोलत होते.

महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे तुम्ही केली…
हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (hindu hruday samrat Balasaheba Thackeray) यांनी सांगितले होते की ज्यादिवशी काँग्रेस – राष्ट्रवादीसोबत (congress-NCP) जाण्याची वेळ येईल तेव्हा त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा आपले दुकान बंद करेन. पण बघा सत्ता कशी असते ते? उद्धव ठाकरे म्हणतात की तुम्ही आम्हाला लोटले, परंतु उद्धवजीना ती खुर्ची आ जा ..आ जा असे करून बोलवत होती आणि त्याकडे पाहून उद्धवजीही आ रहा हुं म्हणत होते अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.

म्हणून एकनाथ शिंदेंसह ते ४० जण आमच्याकडे परत आले…

आमच्यासोबत, आमच्या मतांवर तुम्ही निवडून आलात आणि केवळ खुर्ची आणि मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलात. त्यामुळे या महाराष्ट्रात पहिली गद्दारी उद्धव ठाकरे तुम्ही केली असल्याचा पलटवारही फडणवीस यांनी केला. तर एकनाथ शिंदे आणि चाळीस जण हे ज्यांच्यासोबत मते मागून निवडून आले, त्यांच्याकडे परत आले. या चाळीस लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत मते मागितली नव्हती. त्यामुळे उद्धवजी त्यांना गद्दार म्हणायचा तुम्हाला अधिकार नाहीये अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.

संताजी – धनाजी यांच्याप्रमाणे त्यांना मोदी – शहा दिसतात…
ज्याप्रमाणे मुघल सैनिकांना जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी संताजी आणि धनाजी दिसायचे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा (Pm Narendra Modi & Amit shaha) यांचे नाव घेतले की तशीच अवस्था यांची झाली आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेसला (uddhav Thackeray, sharad pawar, Congress) जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सैनिकांबरोबर दिवाळी साजरी केली जाते. तर उद्धव ठाकरे वरळीतही शिवसैनिकांना भेटण्यासाठी जात नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

१२ हजार ५०० कोटींच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन…
मुंबई महापालिकेत १२ हजार ५०० कोटींचा अपहार झाल्याचे कॅगने सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील या १२ हजार ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसआयटीची घोषणा केल्याचे सांगत एसआयटीच्या माध्यमातून त्यांच्या तिजोरीत गेलेला पैसा आम्ही परत आणू, असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार बुडविले…
शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे दोन कार्यक्रम आहेत. ज्यांनी शिवसेना वाचविली त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा, तर ज्यांनी शिवसेनाप्रमुखांचे विचार बुडविले, त्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दुसरा कार्यक्रम. भाजपा-शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली. हिंदुत्व आणि युती सरकारसाठी मतदारांना आवाहन केले. पण खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनीच केली. खरे गद्दार तुम्हीच आहात. तुम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही, अशी जोरदार टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.

देवेंद्र फडणवीस यांचे कपिल पाटील यांनी मानले आभार…
केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भाषणात भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या २८ हजार कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याण-मुरबाड रेल्वे, देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडी मेट्रो, एमएमआरडीएच्या माध्यमातून कॉंक्रिट रस्ते अशी कामे मार्गी लावली याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुरबाड रेल्वे स्थानकाला शांतारामभाऊ घोलप यांचे नाव द्या…
मुरबाड तालुक्याचे भाग्यविधाते शांतारामभाऊ घोलप आहेत. नियोजित मुरबाड रेल्वे स्थानकाला शांतारामभाऊ घोलप यांचे नाव द्यावे, अशी आग्रही मागणी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली. त्याचबरोबर भातसा धरणातील पाणी सिंचनासाठी आणि धरणासाठी जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना २५ कोटी रुपयांची थकबाकीची रक्कम देण्याची मागणीही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केली.

या वेळी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी.  रवी, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, मोदी@९ चे प्रदेश संयोजक-आमदार प्रविण दरेकर यांच्यासह भाजपाचे आमदार गणपत गायकवाड, कल्याण पश्चिम विधानसभा प्रमुख नरेंद्र पवार आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा