Home ठळक बातम्या अब्दुल सत्तारांविरोधात कल्याणातही राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने; रास्ता रोकोचा प्रयत्न

अब्दुल सत्तारांविरोधात कल्याणातही राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने; रास्ता रोकोचा प्रयत्न

 

कल्याण दि. ८ नोव्हेंबर :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या अपशब्दावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संपूर्ण राज्यभरात अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली असून ठिकठिकाणी आंदोलने सुरू असून कल्याणच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकातही आज राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आले. भर चौकात रस्त्यावर ठिय्या मांडत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. (NCP protests against Abdul Sattar in Kalyan too; Roadblock attempt)

यावेळी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. अब्दुल सत्तार हाय हाय, पन्नास खोके यांच्यासह माफीनामा नको राजीनामा पाहीजे आदी घोषणा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. तर निदर्शने करणाऱ्या महिला कार्यकर्ता अचानक आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा पोलिस ठाण्यात जाऊन अब्दुल सत्तार यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा