Home ठळक बातम्या थंडीची लाट : पुढच्या चार दिवसांत हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज

थंडीची लाट : पुढच्या चार दिवसांत हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज

 

कल्याण डोंबिवली दि. १३ जानेवारी :
गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील इतर भागांप्रमाणे डोंबिवलीपासून ते बदलापूर पट्ट्यातील नागरिक थंडीने चांगलेच गारठून गेले आहेत. मात्र अशातच आता येत्या पुढच्या चार दिवसांत या भागात हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद होण्याचा अंदाज हवामान खात्यासह विविध तज्ञांनी वर्तवला आहे. त्यामूळे सकाळी सकाळी विविध कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या लोकांनी अधिक काळजी घेऊन बाहेर पडण्याचे आवाहन हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी एलएनएनशी बोलताना केले आहे. (Cold wave: Seasonal low temperatures are expected to be recorded in the next four days)

गेल्या दोन तीन दिवसांपासून संपूर्ण राज्याच्या विविध भागांसह आपल्याकडे तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. कल्याण डोंबिवलीचाच विचार केला असता गेले तिन्ही दिवस लागोपाठ १२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद होत आहे. अंबरनाथ बदलापूरमध्ये तर तापमान १० अंशांच्याही खाली आल्याचे दिसून येत आहे.

मात्र उद्यापासून पुढील तीन चार दिवस या तापमानात आणखीन घट होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. उत्तरेकडील भागात येणाऱ्या मजबूत पश्चिमी विक्षोभामुळे  (Western Disturbance) आपल्याकडे वार्‍याची दिशा बदलून पुन्हा उत्तर / पश्चिम अशी होईल. परिणामी कोरड्या हवेमुळे मकरसंक्रांतीच्या आसपास तापमानात घट दिसून येऊ शकते असे मोडक यांनी सांगितले. तसेच पश्चिम विक्षोभ  (Western Disturbance) एकदा पुढे सरकल्याने उत्तर भारतातून थेट ५०°उत्तर रेखांशावरुन उतरणारी थंड हवा आपल्याकडेही पोहोचण्याची शक्यता असल्यानेच ही थंडीची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यताही हवामान अभ्यासक मोडक यांनी व्यक्त केली.

तर उद्यापासून आपल्याकडील तापमानामध्ये सामान्य तापमानापेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअसची घट दिसू शकते आणि ज्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परिणामी मुंबई परिसरात कमाल तापमान २६-२८° अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२-१४° आसपास राहण्याचा अंदाज आहे. तर कल्याण डोंबिवलीतील कमाल तापमान २८-३०° अंश सेल्सिअस आणि किमान तापमान थेट ९-१०° अंशांपर्यंत खाली येऊ शकते. तर बदलापूर कर्जत पट्टय़ात कमाल तापमान २८-३२° आणि किमान ७-९° अंशापर्यंत खाली येऊ शकते असे मोडक म्हणाले.

या घटत्या तापमानाचा विचार करता सकाळच्या वेळेत फिरायला, कामावर जाणाऱ्या नागरिकांनी आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक काळजी घेऊन घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा