Home ठळक बातम्या डोंबिवलीत दरवळतोय रंगी – बिरंगी गुलाबांचा सुगंध ; राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शनाला प्रारंभ

डोंबिवलीत दरवळतोय रंगी – बिरंगी गुलाबांचा सुगंध ; राज्यस्तरीय गुलाब प्रदर्शनाला प्रारंभ

 

डोंबिवली दि.१३ जानेवारी :
सांस्कृतिक उप राजधानी अशी ओळख असलेली डोंबिवली नगरी सध्या रंगी बिरंगी गुलाबांच्या सुगंधांनी दरवळली आहे. निमित्त आहे ते एम एम आर रीजनमधील सर्वात मोठ्या डोंबिवली रोझ फेस्टिवलचे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन झालेल्या या गुलाब प्रदर्शनामध्ये गुलाबाच्या एक हजाराच्या आसपास वेगवेगळ्या प्रजाती पाहायला मिळतील. डोंबिवली पश्चिमेच्या बालभवनमध्ये आयोजित हे प्रदर्शन येत्या रविवारपर्यंत पाहता येणार आहे. ,(The scent of colorful roses wafting through Dombivli; State level rose exhibition started)

रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या डोंबिवलीकर रोझ फेस्टिवलचे यंदाचे १३ वे वर्ष आहे. ज्यामध्ये शेकडो रंग आणि सुवासासह दुरंगी, रेघांची आणि मिनिएचर स्वरूपातील गुलाब पाहण्यासाठी लोकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केली. इंडियन रोझ फेडरेशन या अखिल भारतीय गुलाबप्रेमी संस्थेच्या वतीने महाराष्ट्रात मोठया प्रमाणावर गुलाब शेती करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना डोंबिवली रोझ फेस्टिवलमध्ये निमंत्रित केले असून मुंबई, पुणे, वांगणी, पनवेल, शहापूर, नाशिक येथून प्रदर्शक सहभागी झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आयोजक रविंद्र चव्हाण यांनी दिली.

तर डोंबिवली रोझ फेस्टिवलशी पहिल्या वर्षांपासून निगडित असलेल्या म्हसकर डॉक्टर दाम्पत्याचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कल्याणच्या सुप्रसिद्ध डॉ विकास म्हसकर व डॉ मेघना म्हसकर यांनी सरळगावच्या बागेत गेली तीन चार दशके हजारो गुलाब पुष्पे जोपासली आहेत.

राज्याच्या विविध भागातून आलेल्या या गुलाबपुष्प स्पर्धेत वांगणीच्या आशिष मोरे यांच्या मोरे नर्सरीच्या गुलाबांनी गुलाबांचा राजा आणि गुलाबांची राणी हे दोन्ही पुरस्कार पटकविले. पुणे रोझ फेडरेशनच्या फुलांना राजकुमार तर वांगणीच्या चंद्रकांत मोरे नर्सरीला राजकुमारीचा पुरस्कार मिळाला. गुलाब पुष्प स्पर्धेचे परीक्षण डॉ विकास म्हसकर, बळवंत ठिपसे, रविंद्र भिडे यांनी केले. तर सांगलीच्या पटवर्धन यांची अनेक देशांनी प्रसिद्ध केलेली गुलाब चित्र टपाल तिकिटेही या प्रदर्शनात मांडलेली पाहायला मिळतील.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा