कल्याण दि.24 एप्रिल :
लोकसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील हॉट सीटपैकी एक असणारी कल्याण लोकसभा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याठिकाणी महविकास आघाडीच्या उमेदवाराकडून प्रचारात विश्वासात घेत जात नसल्याचे सांगत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास अवघे दोनच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आले आहेत. (Congress party’s displeasure with Mahavikas Aghadi candidate in Kalyan Lok Sabha; Accused of not believing in propaganda)
कल्याण लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील सर्वात अधिक लक्ष लागून राहिलेल्या मतदार संघापैकी एक आहे. याठिकाणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे आपली हॅटट्रिक साधण्यासाठी महायुतीतर्फे निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून उध्दव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर त्यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. मात्र त्यांना आता महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेला काँग्रेस पक्ष कमालीचा नाराज झाला आहे. एकीकडे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे विरोधी पक्षाच्या घरी भेटी देऊन सहकार्यासाठी त्यांना साद घालत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा एकाकी प्रचार सुरू असून स्थानिक पदाधिकारी आणि नगरसेवक यांना दुर्लक्षित करत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त महविकास आघाडी उमेदवार वैशाली दरेकर या काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या मतदारसंघातील वॉर्डात प्रचारासाठी फिरत होत्या. मात्र दरेकर यांनी या दौऱ्याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता प्रचार केल्यावरून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते कमालीचे नाराज झाल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष विनोद तिवारी आणि कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांनी यावेळी दिली.
वैशाली दरेकर या आमचे स्थानिक जिल्हा नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निवडणुकीला सामोरे जाणार असतील तर त्यांनी खुशाल जावे अशी संतप्त प्रतिक्रिया कल्याण पूर्व ब्लॉक अध्यक्ष शकील खान यांच्याकडून प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दिली.
दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात महविकास आघाडीसमोर डॉ. श्रीकांत शिंदे यांचे अतिशय तगडे आव्हान असताना आता त्यात काँग्रेस पक्षाची ही नाराजी महविकास आघाडी आणि वैशाली दरेकर यांना परवडणारी नाही अशी भूमिका राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.