Home ठळक बातम्या मतमोजणी अवघ्या काही तासांवर : …आणि भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा लेटरबॉम्ब

मतमोजणी अवघ्या काही तासांवर : …आणि भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा लेटरबॉम्ब


भिवंडी दि.3 जून :

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असतानाच भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांच्या एका पत्राने खळबळ उडाली आहे. भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना हे पत्र उद्याच्या मतमोजणीबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले आहेत. (Bhiwandi loksabha – Counting of votes just a few hours away: …and a letterbomb from Mahavikas Aghadi candidate in Bhiwandi Lok Sabha)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सरकारद्वारे चुकीच्या हस्तक्षेपाच्या केलेल्या आरोपांचा दाखला महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी या पत्रामध्ये दिला आहे. सरकारकडून निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांवर निवडणूक प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने हाताळण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचे नमूद करत भिवंडी लोकसभेत ही बाब होऊ नये अशी मागणी आणि अपेक्षा सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे.

तर ठाणे जिल्हाधिकारी आणि कपिल पाटील यांचे घरोब्याचे संबंध असून ते नियमित पाटील यांच्या घरी पाहुणचारासाठी जात असल्याचेही म्हात्रे यांनी या पत्रामध्ये लिहिले आहे. त्यांचे हे जिव्हाळ्याचे संबंध संपूर्ण भिवंडीला माहीत असून त्याचा गैरवापर भिवंडी लोकसभा मतमोजणी प्रक्रियेदरम्यान होऊ नये असेही म्हात्रे यांनी या पत्रात म्हटले आहे.

त्यासोबतच निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्याद्वारे निवडणूक मतमोजणी प्रतिनिधी, उमेदवार प्रतिनिधी आणि उमेदवार यांच्यावर दबाव दडपशाही करण्यात येऊ नये, त्याद्वारे आकड्यांची फेरफार करण्यात येऊ नये असेही सुरेश म्हात्रे यांनी या पत्रामध्ये नमूद केले आहे.

दरम्यान लोकसभा मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक असतानाच सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बने उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा