Home ठळक बातम्या कल्याण शहर परिसरात गुलाबी थंडीसह दाट धुक्याची चादर ;एक्यूआय इंडेक्सही आला 113...

कल्याण शहर परिसरात गुलाबी थंडीसह दाट धुक्याची चादर ;एक्यूआय इंडेक्सही आला 113 वर

कल्याण दि.1 डिसेंबर ;:

अख्ख्या नोव्हेंबर महिन्यात आधी पावसाच्या आणि नंतर गेले काही दिवस घामाच्या धारांनंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी निसर्गाने आपली कुस बदलल्याचे दिसून येत आहे. कल्याण शहर परिसरात गुलाबी थंडीची चाहूल लागली असून दाट धुक्याची चादर पसरली आहे. त्यामूळे मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या नागरिकांना एखाद्या हिल स्टेशनला आल्याचे फिलिंग येत आहे.(Dense fog blankets Kalyan city area with pink chill; AQI index also rises to 113)

काल रात्रीपासूनच कल्याण आणि आसपासच्या परिसरातील वातावरणात आल्हाददायक गारवा जाणवू लागला होता. त्यामुळे आता लवकरच गुलाबी थंडी पडेल अशी मनोमन आशा बाळगून होते. तर निसर्गानेही लगेच आज सकाळीच कल्याणकरांना सरप्राईज गिफ्ट देत गुलाबी थंडीसह धुक्याची दुलईही आंथरली. त्यामुळे या वर्षातील अखेरच्या महिन्याचा पहिला दिवस काहीसा स्पेशल ठरला आहे.

आज सकाळपासून कल्याण शहरातील इमारती या धुक्याच्या चादरीमध्ये हरवून गेल्या. खाली रस्त्यांवर या धुक्याचा फार थोडा परिणाम जाणवला. तर नविन कल्याण अशी ओळख असलेल्या कल्याण पश्चिमेतील स्काय लाईन आणि गगनचुंबी इमारती या धुक्यात गायब झाल्याचे दिसून आले. बऱ्याच काळानंतर कल्याण शहर आणि परिसरात इतके दाट धुके किंवा धुरके पडले. सकाळचे आठ वाजायला आले तरी सूर्यदेवाचे लोकांना काही दर्शन घडले नाही. यावरून या दाट धुक्याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

दरम्यान दाट धुक्यामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला असला तरी कल्याणातील हवेची गुणवत्ता मात्र दुर्दैवाने अद्यापही तितकीशी चांगली नाहीये. आज सकाळी सात वाजता 113 इतका एक्यूआय इंडेक्स नोंदवला गेला. जो मॉडरेट प्रकारात मोडत असून श्वसनाशी संबंधित आजार असणाऱ्या व्यक्तींसाठी तितकासा चांगला नाहीये.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा