Home ठळक बातम्या कल्याणात जखमी तरुणासाठी डॉक्टर ठरले देवदूत; मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

कल्याणात जखमी तरुणासाठी डॉक्टर ठरले देवदूत; मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर

आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न फळाला

कल्याण दि.२४ मे :
आपल्याकडे डॉक्टरांना देव किंवा देवदूत असे म्हटले जाते. या शब्दांचा जिवंत अनुभव कल्याणात एका गरीब कामगाराला आला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या या कामगाराला कल्याणच्या आयुष हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने शर्थीचे प्रयत्न करत या कामगाराला अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले आहे. (Doctors became angels in Kalyan; The young man was pulled out from the jaws of death)

टोकदार बांबू पोटात घुसून आरपार…
इमारत बांधकाम क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्तीचा साधारणपणे महिन्याभरापूर्वी अतिशय गंभीर अपघात झाला होता. इमारतीचे काम सुरू असताना उंचीवरून खाली कोसळताना टोकदार बांबू त्याच्या पोटाच्या उजव्या कुशीतून लिव्हर, किडनी ,आतडे आणि फुफ्फुसाला छेदून आरपार बाहेर निघाला. त्यावेळी इतर कामगार आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाने क्षणाचाही विलंब न करता या कामगाराला जवळच्याच आयुष हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

डॉक्टरांचे अक्षरशः शर्थीचे प्रयत्न आणि रुग्णाला जीवनदान…

रुग्णालयात आणले त्यावेळी त्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याने आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्वरित उपाय चालू करून रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवत तातडीने आपत्कालीन शस्त्रक्रियाही केली. तब्बल ८ ते ९ तास चाललेली ही शस्त्रक्रिया हॉस्पिटलचे सर्जन डॉ. शशांक पाटील, डॉ. राजेश राजू , डॉ.अनिकेत वाळिंबे आणि भूलतज्ज्ञ डॉ जितेंद्र बोबडे यांनी यशस्वीरित्या करत या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढत प्राण वाचवले. तर शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. ज्याठिकाणी डॉ. अमित बोटकुंडले, डॉ. विठ्ठल भिसे आणि अतिदक्षता विभागाततील आयसीयू टीमने प्रयत्नांची अक्षरशः पराकाष्ठा करत या कामगाराला नविन जीवदान दिले. सध्या हा रुग्ण स्वतःच उठून बसत आहे, व्यवस्थित बोलत आणि खात असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

आयुष हॉस्पिटलने जपली सामाजिक बांधिलकी…

सामाजिक जाणिवेतून आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि प्रशासनाने अतिशय नाममात्र दरात उपचार केल्याची माहिती डॉ. राजेश राजू यांनी दिली. या खर्चापेक्षा आम्ही एका व्यक्तीचा जीव वाचवू शकलो याचे आम्हाला सर्वाधिक समाधान असल्याची भावनाही आयुष हॉस्पिटलच्या या डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

कल्याणकरांकडून या सर्व डॉक्टरांचे होतेय कौतुक…

दरम्यान आतापर्यंत अशा किचकट शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना मुंबईतील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र आयुष हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी हे चित्र खोडून काढत जपलेल्या या सामाजिक भान आणि जबाबदारीचे कल्याणकरांकडून कौतुक केले जात आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा