Home ठळक बातम्या नालेसफाईचे काम नीट करा नाही, तर ब्लॅकलिस्ट करू – केडीएमसी आयुक्तांची ठेकेदारांना...

नालेसफाईचे काम नीट करा नाही, तर ब्लॅकलिस्ट करू – केडीएमसी आयुक्तांची ठेकेदारांना तंबी

नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीच्या कामाची डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्याकडून पाहणी

कल्याण – डोंबिवली दि.26 मे :
नालेसफाईचे काम व्यवस्थितरित्या न झाल्यास कामाचे बिल न देण्यासह संबंधित ठेकेदाराला ब्लॅक लिस्ट केले जाईल अशी तंबी केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी दिली आहे.
आगामी पावसाळ्याच्या तोंडावर केडीएमसी आयुक्तांनी आज महापालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. (If you don’t do the nullah cleaning work properly, we will blacklist it – KDMC commissioner’s warning to the contractors)

महापालिका क्षेत्रात एकूण ९५ कि.मी. रुंदीचे ९७ नाले आहेत. दरवर्षीपेक्षा काहीशी उशिराने सुरू झालेली केडीएमसी क्षेत्रातील नालेसफाईची कामे येत्या काही दिवसात पूर्ण होण्याचा अंदाज आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करून नाल्यातील गाळ, कचरा काढून टाकण्यात येईल. जेणेकरुन पाऊस येण्यापूर्वी हे नाले चांगल्या पध्दतीने प्रवाहीत होतील असे आयुक्तांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.

या भागातील नाल्यांच्या कामाची केली पाहणी…
महापालिका आयुक्तांनी आज कल्याण पश्चिम येथील महालक्ष्मी हॉटेल, सांगळेवाडी, सर्वोदय मॉल या परिसरातील जरीमरी नाला, साईबाबा मंदिर ते कावेरी स्वीट मार्ट येथील नाला, रामचंद्रनगर नाला, देसलेपाडा येथील डांबरीकरण तसेच म्हसोबा चौक (९० फीट रस्ता) येथील नाल्याची पाहणी केली. तसेच डोंबिवली येथील निळजे खाडी किनारा परिसर, निळजे लोढा परिसरासह एमआयडीसीतील रस्ता दुरुस्तीच्या कामाचीही त्यांनी यावेळी पाहणी केली.

त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना नाले साफसफाईची कामे वेळेत पूर्ण करणेबाबत संबंधीत ठेकेदारांना कठोर निर्देश दिल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी महापालिका सचिव संजय जाधव, परिमंडळ – २ च्या उपायुक्त स्वाती देशपांडे-कुलकर्णी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ, मनोज सांगळे, सहा.आयुक्त तुषार सोनवणे, भारत पवार आणि इतर अभियंता उपस्थित होते.

मागील लेखकल्याणात जखमी तरुणासाठी डॉक्टर ठरले देवदूत; मृत्यूच्या दाढेतून काढले बाहेर
पुढील लेखKidney_Stone : किडनी स्टोनवरील अत्याधुनिक आणि प्रभावी RIR सर्जरी आता कल्याणातही

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा