Home ठळक बातम्या केडीएमसीकडून 10 ठिकाणी बसवण्यात आले फ्लड सेन्सर्स : पूर येण्याआधीच मिळणार पूर्वसूचना

केडीएमसीकडून 10 ठिकाणी बसवण्यात आले फ्लड सेन्सर्स : पूर येण्याआधीच मिळणार पूर्वसूचना

फाईल फोटो – ऋषिकेश जगताप, जुलै २०२१

 

कल्याण – डोंबिवली दि.7 जून :

गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवलीतील सखल भाग जलमय होण्याचे प्रकार दर वर्षागणिक वाढत चालले आहेत. या पार्श्वूमीवर केडीएमसी प्रशासनाने स्मार्ट उपाय योजत कल्याण आणि टिटवाळा परिसरात 10 ठिकाणी फ्लड सेन्सर्स बसवले आहेत. या फ्लड सेन्सर्सच्या माध्यमातून पूर येण्याच्या सुमारे अर्धा ते पाऊण तास आधीच प्रशासनाला अलर्ट मिळणार असल्याने नुकसान टाळण्यास मोठी मदत होणार आहे. (Flood sensors installed in 10 places: Early warning before flood)

2005 मध्ये आलेल्या महापुराने कल्याण डोंबिवलीची पुरती दैना झाली होती. त्या महापुरामध्ये विशेषतः कल्याण पूर्व पश्चिम आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या जीवित हानीसह लाखोंचे नुकसान झाले. 2005 नंतर सुदैवाने तेवढा मोठा महापूर आला नसला तरी भविष्यात अशी आपत्ती पुन्हा येणार नाही याची शाश्वती कोणीच घेऊ शकत नाही. मात्र गेल्या 17 वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. एकीकडे कल्याण डोंबिवलीत 17 वर्षांत प्रचंड मोठ्या संख्येने बांधकामे झाली असून गेल्या काही वर्षांत सखल भागात पाणी साचण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. 2015 नंतर तर शहरांतील खाडी किनारी आणि सखल भाग पावसाळ्यात वारंवार जलमय होऊ लागले आहेत. ज्यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी होत नसली तरी लोकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात वारंवार उद्भवणारी ही परिस्थिती पाहता नागरिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी केडीएमसीच्या स्मार्ट सिटी विभागाने कल्याण डोंबिवलीत 10 ठिकाणी हे फ्लड सेन्सर्स बसवले आहेत. या सेन्सर्सच्या माध्यमातून पूर येण्याची पूर्वसूचना प्रशासनाला अगोदरच मिळणार असून त्यामुळे जीवित आणि आर्थिक नुकसान टाळण्यात मोठी मदत होणार असल्याचा विश्वास स्मार्ट सिटीच्या आयटी विभागाचे प्रमुख प्रशांत भगत यांनी व्यक्त केला.

याठिकाणी लावण्यात आलेत फ्लड सेन्सर्स…

जी के पंपिंग स्टेशन पत्रीपुल, कल्याण पश्चिम
भवानी चौक गणेश घाट, कल्याण पश्चिम
टिटवाळा पश्चिम, स्मशान घाट
चिंचपाडा, साकेत कॉलेज, कल्याण पूर्व
मोहने जलशुद्धीकरण केंद्र
मोहिली जलशुद्धीकरण केंद्र
रेती बंदर, कल्याण खाडी
आधारवाडी एसटीपी, सोनवणे कॉलेज
टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्र

हे फ्लड सेन्सर्स करणार असे काम…

या 10 ठिकाणी बसवण्यात आलेले फ्लड सेन्सर्स हे लेझर किरणांच्या माध्यमातून खाडी आणि नदीतील पाण्याची पातळी सतत तपासत राहणार. पावसाळ्यात ही पाण्याची पातळी जसजशी वाढेल तसा स्मार्ट सिटी कंट्रोल आणि कमांड सेंटरला त्याचा अलर्ट प्राप्त होईल. ज्यामुळे पाण्याची पातळी वाढत असल्याचे केडीएमसी प्रशासनाला लगेचच लक्षात येईल आणि त्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यास वेळ मिळेल. त्यासोबतच कल्याणमध्ये बसवण्यात आलेल्या स्मार्ट सिटीच्या डिस्प्ले बोर्डवरही वाढत्या पाणी पातळीबाबत माहिती दाखवली जाईल. तसेच शहरात 28 ठिकाणी बसवण्यात आलेल्या उद्घोषक यंत्रणेच्या माध्यमातून नागरिकांनाही त्याची सूचना दिली जाईल असेही प्रशांत भगत यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा