Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीकरांनो,मतदार यादीतील आपल्या नावांबाबत जागरूक राहा – केडीएमसीचे आवाहन

कल्याण डोंबिवलीकरांनो,मतदार यादीतील आपल्या नावांबाबत जागरूक राहा – केडीएमसीचे आवाहन

यंदाची निवडणूक होणार पॅनल (त्रिसदस्य) पध्दतीने

कल्याण दि.21 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली असून ‘मतदार यादीतील आपल्या नावांबाबत नागरिकांनी जागरूक राहण्याचे आवाहन महापालिका सचिव तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे. निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघासोबत झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाद्वारे त्यांनी नागरिकांना हे आवाहन केले.
केडीएमसीच्या स्थापनेनंतर यंदा पहिल्यांदाच पॅनल पध्दतीने (त्रिसदस्यीय) निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमात संजय जाधव यांनी या पॅनल पद्धतीने होणाऱ्या निवडणुकीबाबत पत्रकारांना मार्गदर्शन केले.

आतापर्यंत झालेल्या म्हणजेच 2015 पर्यंतच्या पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका या एक सदस्यीय पध्दतीने घेण्यात आल्या आहेत. तर आताची होणारी निवडणूक ही त्रिसदस्यीय अर्थातच पॅनल पध्दतीने असणार आहे. त्यामुळे यापूर्वी आपल्याकडे असणारे 122 प्रभागांत बदल होऊन ते आता 41 असणार आहेत.
यामध्ये 40 प्रभागात त्रिसदस्य ( 3 उमेदवार) तर उर्वरित एका प्रभागात 2 सदस्य असणार आहेत. तर आता तीन प्रभाग मिळून एक प्रभाग असल्याने लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे 37 हजार मतदारांचा प्रभाग होऊ शकतो. त्यातही 10 टक्के मतदारांची संख्या ही कमी किंवा जास्त होऊ शकते. त्यामूळे प्रत्येक मतदाराला आता 3 सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार असल्याचे संजय जाधव यांनी सांगितले.

मात्र हे मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीत असणे आवश्यक असणार आहे. मतदार यादीच्या पुनर्निरिक्षणाचा कार्यक्रम शासनातर्फे राबवण्यात येत असून महापालिका आणि शासकीय यंत्रणा त्यावर काम करत आहेत. त्यामूळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी आताच मतदार यादीतील नावे तपासून घ्यावीत, ही नावे योग्य ठिकाणी आहेत का, काही नावे कमी झाली असतील ती कमी करून घ्या, जी नावे वाढली असतील ती आणि 18 वर्षांवरील व्यक्तींची नावे ती त्यात समाविष्ट करून घ्या. जेणेकरून आगामी महापालिका निवडणुकीत मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही असेही त्यांनी सांगितले.
तर केडीएमसी प्रशासनही मतदार याद्या बनवण्यासाठी अद्ययावत टेक्नॉलॉजीच्या आधारे मतदार याद्यांचे काम करणार आहे. जेणेकरून एका क्लिकवर, एका कॉलवर किंवा एसएमएसद्वारे मतदार यादीतील मतदाराचे नाव लगेच समजू शकेल. नागरिकांनी निवडणुकीपूर्वी आवश्यक ती प्रक्रिया पार पाडली तर मतदानापासून ते वंचित राहणार नाही असेही जाधव यावेळी म्हणाले.

कोणत्याही निवडणुकीत मतदार यादी ही महत्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे राजकारणी असो की सामान्य मतदार त्यांनी या मतदार यादीबाबत अत्यंत जागरूक राहणे आवश्यक असल्यावर सचिव संजय जाधव यांनी या कार्यक्रमात अधिक भर दिला. तर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूकीबाबत येणाऱ्या सूचनांबाबत वेळोवेळी माहिती प्रसिद्ध केली जाईल असेही त्यांनी सांगितले.।

2 कॉमेंट्स

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा