Home ठळक बातम्या विधानसभा निवडणुकीत लोकंच त्यांच्या डोळ्यात अंजन घालतील – खासदार डॉ श्रीकांत शिंदे...

विधानसभा निवडणुकीत लोकंच त्यांच्या डोळ्यात अंजन घालतील – खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा विरोधकांना टोला

विजयी हॅटट्रिकबद्दल खा.डॉ. शिंदे यांचा कल्याणात राष्ट्रवादीतर्फे जाहीर सत्कार

कल्याण दि.23 जून :
काही लोकांना वाटतं की आम्हाला सहानुभूती आहे, मात्र सहानुभूती असती तर ते लाखांच्या मतांनी निवडून आले असते. परंतू महाराष्ट्रात महविकास आघाडी आणि महायुतीच्या मतदानामध्ये केवळ 0.3 टक्क्यांचाच फरक असून आगामी विधानसभा निवडणुकीत लोकं तुमच्या डोळ्यात अंजन घातल्याशिवाय राहणार नाहीत अशा शब्दांत कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.

कल्याण लोकसभेत सलग तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस कल्याण डोंबिवली जिल्ह्याच्या वतीने आणि जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या पुढाकाराने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना खा. शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना या विजयाचे श्रेय देऊन आभार मानत विरोधकांचाही खरपूस समाचार घेतला.

19 टक्क्यांपैकी 14.5 टक्के मतदान आम्हाला…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेची महाराष्ट्रात 19 टक्के मते असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांमध्ये विकासकामांचा जो झपाटा लावला. त्याने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील मराठी माणूस बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत उभा राहिला. या 19 टक्क्यांपैकी 14.5 टक्के मतदान आम्हाला झाले असून उर्वरित मतदान विधानसभा निवडणुकीत आपल्याकडेच येईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकांची दिशाभूल सारखी सारखी नव्हे तर एकदाच…
तर लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी चुकीचा नरेटिव्ह आणि लोकांची दिशाभूल करून एका विशिष्ट धर्म आणि जातीचे मतदान स्वतःच्या पारड्यात पाडून घेतले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे हे सगळं तात्पुरते चित्र असून लोकांची दिशाभूल सारखी सारखी नव्हे तर एकदाच होऊ शकते असे यावेळी सांगितले.

शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांची गरज…
तर सलग तिसऱ्यांदा निवडून आणल्याबद्दल खा. डॉ. शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानत आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी अशाच प्रकारे एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. आजच्या परिस्थितीत शिवसेना पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मजबूत पक्ष बांधणी करणे आवश्यक असल्यानेच आपण केंद्रातील मंत्रीपदाला विनम्रपणे नकार दिल्याची प्रांजळ कबुलीही खा. डॉ. शिंदे यांनी दिली.

खा. डॉ. शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या पुढाकाराने जाहीर सत्कार…
दरम्यान कल्याण लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या पुढाकाराने खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार विश्वनाथ भोईर, भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा