Home ठळक बातम्या कल्याण पश्चिम विधानसभेतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक – माजी सभागृह नेते श्रेयस...

कल्याण पश्चिम विधानसभेतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक – माजी सभागृह नेते श्रेयस समेळ

कल्याण दि.22 जून :
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती केडीएमसीचे माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

शहराच्या प्रगतीसाठी – विकासासाठी काम करण्याची इच्छा…
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला लोकांनी चांगले मतदान केले आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. कल्याण शहराने आमच्या कुटुंबाला भरपूर काही दिले आहे. आपणही यापूर्वी नगरसेवक, सभागृह नेते पद आणि विविध समित्यांवर आपण काम केले असल्याने प्रशासनाची आपल्याला चांगली जाण आहे. त्या पार्श्वभूमीवर आता एक नागरिक म्हणून या शहराप्रती आपलीही बांधिलकी असून या शहराच्या प्रगतीसाठी – विकासासाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे श्रेयस समेळ यांनी यावेळी सांगितले.

आपल्यासारख्या उच्चशिक्षित व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार करतील…
तर आपण बी. ई. मेकॅनिकलसह एमबीए मार्केटिंगची पदवी घेतली आहे. त्यामुळे सुशिक्षीत लोकांनी राजकरणात यावे, सुशिक्षीत लोकंही राजकरणात यावीत अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि पक्षाचे वरिष्ठही आपल्यासारख्या उच्चशिक्षित व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार करतील असा विश्वास समेळ यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाणे मुंबईच्या धर्तीवर आपल्या कल्याण शहराचाही विकास व्हावा…
आपण लोकप्रतिनिधी झाल्यापासून आपल्या शेजारील ठाण्याचा विकास पाहत आहोत. या ठाणे मुंबईच्या धर्तीवर आपल्या कल्याण शहराचाही विकास व्हावा अशी आपली प्रामाणिक भावना आहे. मात्र विशेषतः प्रशासकीय कार्यकाळात ज्या वेगाने शहराचा विकास होणे अपेक्षित होते, तसा तो झालेला दिसत नाहीये. या शहराच्या विकासासाठी , समस्या सोडवण्यासाठी आपल्याकडे व्हिजन असून आपल्याला संधी दिल्यास त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास श्रेयस समेळ यांनी यावेळी व्यक्त केला.

पक्ष जो आदेश देईल त्याला शिरसावंद्य मानून काम करू…
तर सध्याचे आमदार विश्वनाथ भोईर हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे काही गैर नसून पक्ष जो आदेश देईल त्याला शिर सावंद्य मानून काम करू असेही श्रेयस समेळ यांनी यावेळी स्पष्ट केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा