कल्याण डोंबिवली दि.14 मे :
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशामूळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष पाहायला मिळत आहे. कल्याण डोंबिवलीतही कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजरात नाचत कर्नाटकमधील विजयाचे स्वागत केले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यामध्ये काँग्रेसने भाजपला मागे सारत सत्ता काबीज केली. कल्याण पश्चिमेच्या छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे या विजयाचे जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत आणि एकमेकांना पेढे भरवत आपला आनंद व्यक्त केला. जोडीला फटाक्यांची आतषबाजी आणि काँग्रेस जिंदाबादची जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
तर ” ये तो अभी झाकी है, पुरा देश अभी बाकी है ” अशा शब्दांत जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी या कर्नाटक विजयावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच भारतीय जनता पक्षाला दक्षिणेतून हद्दपार करण्याचे काम सर्वसामान्य जनतेने केलं आहे. केरला स्टोरीसारखे पिक्चर आणून भाजप धार्मिक तेढ निर्माण करत असली तरी आता लोकं जागृत झाले आहेत. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत देशभरात पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास पोटे यांनी व्यक्त केला.
यावेळी काँग्रेसचे विमल ठक्कर, मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान डोंबिवली पश्चिमेतील इंदिरा गांधी चौकातही काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केल्याचे दिसून आले.