आतापर्यंत १ हजारांहून अधिक अनधिकृत बॅनर्स आले हटवण्यात
कल्याण डोंबिवली दि.१४ जानेवारी :
रस्त्यांवर जागा मिळेल तसे आणि वाट्टेल तसे अनधिकृत बॅनर लावून शहरांचे सौंदर्य बिघडवणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापनां विरोधात केडीएमसी (kalyan DOMBIVLI municipal corporation KDMC) चांगलीच आक्रमक झाल्याची दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स लावणाऱ्या ३० व्यक्ती आणि आस्थापनांविरोधात केडीएमसी प्रशासनाने कल्याण डोंबिवलीच्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. (KDMC registered a case against 30 people who disfigured the city by putting up banners and posters)
महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी शहर सौंदर्यीकरण अभियान सुरु आहे. मात्र अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स या अभियानाला आणि पर्यायाने शहर सौंदर्यीकरणालाच सुरुंग लावण्याचे काम करत आहेत. महापालिका प्रशासनाकडून असे बॅनर आणि पोस्टर्स काढण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून अधिक तीव्र करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही काही व्यक्ती आणि आस्थापना या महापालिका प्रशासनाच्या नाकावर टिच्चून आपले अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्स शहरात ठिकठिकाणी लावून एकप्रकारे केडीएमसीलाच आव्हान देत होत्या. त्यामूळे अखेर केडीएमसी प्रशासनानेही त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेला आपल्या आक्रमक पवित्र्याने उत्तर दिल्याचे दिसत आहे.
शहर विद्रुपीकरणात भर घालणाऱ्या रस्त्यांच्या दुभाजक आणि विद्युत खांबावरील सुमारे १ हजार अनधिकृत पोस्टर्स/बॅनर्स महापालिकेने काढण्याची कारवाई गेल्या १५ दिवसांत केली आहे.
प्रभागक्षेत्र निहाय दाखल झालेले गुन्हे…
१/अ प्रभागाअंतर्गत ३ आस्थापनांविरोधात खडकपाडा आणि मांडा टिटवाळा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
२/ब प्रभागाअंतर्गत ५ आस्थापनांवर खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
३/क प्रभागाअंतर्गत ६ आस्थापनांवर महात्मा फुले पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
४/जे प्रभागा अंतर्गत ४ आस्थापनांवर/व्यक्तींवर कोसळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
५/ड प्रभागाअंतर्गत १ आस्थापनेविरोधात कोसळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
६/फ प्रभागाअंतर्गत २ आस्थापनांवर टिळकनगर पोलिस ठाण्यात आणि ४ आस्थापनांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
७/ह प्रभागाअंतर्गत ३ आस्थापनांवर विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
८/ग प्रभागा अंतर्गत २ आस्थापनांवर रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
दरम्यान यापुढेही गुन्हे दाखल करण्याची ही कारवाई अशीच सुरू राहील अशी माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे.