कल्याण दि.२४ नोव्हेंबर :
कल्याण पूर्वेतील इमारतीमध्ये शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात अखेर वन विभागासह इतर पथकांना अखेर संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास यश आले. गुरुवारी सकाळपासून सुरू झालेला हा थरार संपण्यासाठी तब्बल 9 तास लागले. मात्र या सर्व थरारार या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये वन विभाग अधिकाऱ्यासह चार जण जखमी झाले आहेत.
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली चिंचपाडा मार्गावर असणाऱ्या एका इमारतीत सकाळी साडे नऊ ते दहाच्या सुमारास हा बिबट्या शिरला. आणि इमारतीतील रहिवाशांसह स्थानिक परिसरात एकच खळबळ उडाली. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा बिबट्या जाऊन बसला होता.
बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी या ठिकाणी एकच गर्दी…
या इमारतीत बिबट्या शिरल्याची माहिती मिळताच वन विभाग, केडीएमसी अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. एकीकडे इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याने घबराट पसरली असतानाच या बिबट्याला पाहण्यासाठी लोकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली होती.
शोधण्यासाठी वन विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याची मदत…
वनविभाग आणि केडीएमसी दलाने सुरुवातीला या इमारतीचे प्रवेशद्वार तातडीने बंद करून हा बिबट्या इतरत्र जाऊ नये याची खबरदारी घेतली. तर त्यापाठोपाठ बिबट्या पकडण्यामध्ये एक्स्पर्ट असणाऱ्या वन विभागाच्या ठाण्यातील टीमलाही इकडे पाचारण करण्यात आले. तोपर्यंत हा बिबट्या या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरच ठाण मांडून बसला होता. मात्र त्याचा नेमका ठावठिकाणा समजत नसल्याने अखेर त्याचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी वन विभागाकडून ड्रोन कॅमेऱ्याची मदत घेण्यात आली.
बिबट्याचा वन अधिकाऱ्यावर हल्ला…
सकाळची दुपार आणि दुपार होऊन संध्याकाळ होत आली तरी अद्याप बिबट्याला पकडण्यात यश येत नसल्याने स्थानिक नागरिकांसह वन विभागही काहीसा चिंतेत पडला होता. कारण बिबट्याला पकडण्याच्या पहिल्या प्रयत्नात वन विभागाचे दिनेश गुप्ता यांच्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ते जखमी झाले होते. त्यामुळे बिबट्याला शांत करून मगच पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करण्याचे मनसुबे वन विभागाने आखले.
संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास थरार संपला..
आणि अखेर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वन विभागाने इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावर गेलेल्या बिबट्याला यशस्वीपणे बेशुद्धीचे इंजेक्शन मारले. आणि काही वेळाने हा बिबट्या निपचित पडल्यानंतर वन विभागाने क्षणाचाही विलंब न करता बिबट्याला जेरबंद केले.
बिबट्याला पकडताच एकच जल्लोष…
बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यात यश आल्याचे समजताच या परिसरात उपस्थित नागरिकांनी एकच मोठा जल्लोष केला. वन विभागाने या बिबट्याला खाली आणत वन विभागाकडून मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या दिशेने नेण्यात आले.
चार वर्षे नर जातीचा हा बिबट्या…
बिबट्याला पकडण्यासाठी चाललेल्या या ऑपरेशनमध्ये वन विभागाला केडीएमसी अग्निशमन दलासह अनेक प्राणीमित्र संस्थांची मोठी मदत झाली. चार वर्षे नर जातीचा हा बिबट्या असून त्याला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथे सोडण्यात येणार असल्याची माहिती वनाधिकारी गिरिजा देसाई यांनी दिली आहे.