Home क्राइम वॉच एमसीएचआयमधील एकाही विकासकाचा रेरा घोटाळ्यात सहभाग नाही – एमसीएचआय कल्याण डोंबिवली

एमसीएचआयमधील एकाही विकासकाचा रेरा घोटाळ्यात सहभाग नाही – एमसीएचआय कल्याण डोंबिवली

मात्र घोटाळ्यामुळे अधिकृत विकासकांच्या परवानग्या होतोय विलंब

कल्याण दि. २५ नोव्हेंबर :
बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी मिळवल्याने प्रकाशझोतात आलेल्या डोंबिवली आणि २७ गावांतील रेरा घोटाळ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संघटना असलेल्या एमसीएचआय (Maharahstra Chamber of Housing Industry) मधील एकाही विकासकाचा सहभाग नाहीये. मात्र त्यानंतरही या घोटाळ्यामूळे अधिकृत विकासकांना बांधकाम परवानगी मिळवण्यात विलंब लागत असल्याची माहिती एमसीएचआयच्या कल्याण डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी दिली. रेरा घोटाळा उजेडात आल्यानंतर नियमानुसार काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती देण्यासाठी आज कल्याणात एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

केडीएमसीकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे बांधकाम परवानगी आणि त्यावरून रेरा मिळवल्याचे प्रकरण आर्किटेक्ट संदीप पाटील यांनी बाहेर काढले आहे. याप्रकरणी ६४ बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून ठाणे पोलिसांच्या एसआयटीमार्फत तपास केला जात आहे. तर केंद्र सरकारच्या ईडी संचालयानेही या सर्व प्रकरणाची माहिती मागवत चौकशी सुरू केली आहे.

घोटाळ्यात आमच्यातील एकही विकासक नाही…

मात्र या सर्व घोटाळ्यात बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संघटना असलेल्या एमसीएचआय (Maharahstra Chamber of Housing Industry) मधील एकाही विकासकाचा सहभाग नसल्याची माहिती अध्यक्ष भरत छेडा यांनी यावेळी दिली. तसेच या घोटाळ्यामुळे कल्याण डोंबिवलीतील अधिकृत विकासकांचे विनाकारण नाव खराब होत असल्याची खंतही छेडा यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिकृत काम करणाऱ्यानाच सर्व कायदे लागू…
तर या सर्व घोटाळ्यामूळे एमसीएचआय संघटनेच्या विकासकांना बांधकाम परवानगी मिळण्यात आता तीन तीन महिने लागत आहेत. अधिकृत काम करणाऱ्याला सर्व कायदे आणि अनधिकृत कामे करणाऱ्यांना एकही कायदा लागू नाही या परिस्थितीला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल एमसीएचआय कल्याण डोंबिवलीचे माजी अध्यक्ष रवी पाटील यांनी यावेळी केला. तर हा घोटाळा केवळ एका व्यक्तीचा नसून त्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांचेही लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

छाननीसाठी एक डेस्क ऑफिसची नेमणूक करा…

अधिकृत विकासकांना लवकरात लवकर परवानगी मिळण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेत केडीएमसीसोबतच रेरा संस्थेकडून कागदपत्रांची छाननी करण्यासाठी एक डेस्क ऑफिसर नेमणे आवश्यक आहे. बांधकाम व्यावसायिकांकडून करोडो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे आणि त्यानंतरही आम्हाला त्रास होत असेल तर ते योग्य नसून आम्हाला लवकरात लवकर बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे अशी मागणीही रवी पाटील यांनी यावेळी केली.

या पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव अरविंद वरक, सदस्य सुनिल चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा