Home ठळक बातम्या केडीएमसीआधीच मनसेने केलं ‘वडवली’ उड्डाणपूलाचे लोकार्पण

केडीएमसीआधीच मनसेने केलं ‘वडवली’ उड्डाणपूलाचे लोकार्पण

 

कल्याण दि.22 मार्च :
कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची आकडेवारी लक्षणीयरीत्या वाढत असताना दुसरीकडे उड्डाणपूलावरूनही चांगलेच राजकारण रंगलेले पाहायला मिळत आहे. उड्डाणपूलाचे काम पूर्ण होऊनही तो सुरू होत नसल्याने मनसेने शासकीय कार्यक्रमापूर्वीच आज त्याचे लोकार्पण केले. मनसे आमदार राजू पाटील यांच्या प्रमूख उपस्थितीत हे लोकार्पण करण्यात आले.

कल्याणच्या वडवली आणि आंबिवली भागांना जोडणाऱ्या या रेल्वेफाटकावरील उड्डाणपुलाचे गेल्या 11 वर्षांपासून काम सुरू होते. अनेक तांत्रिक अडचणीना तोंड दिल्यानंतर आता कुठे हा पूल पूर्णत्वास आला आहे. त्याचे या आठवड्यात उद्घाटन होणे अपेक्षित असताना काही कारणास्तव हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने आज संध्याकाळी गनिमीकावा करत हा पूल वाहतुकीसाठी खुला केला. याठिकाणी लावलेले पत्रे मनसैनिकांनी बाजूला करत दोन्ही दिशेची वाहतूक सुरू केली. गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या लोकांना यायला जायला त्रास होत आहे. मात्र तरीही मान्यवरांना वेळ नसल्याने या उड्डाणपूलाचे लोकार्पण केले जात नव्हते म्हणून आम्ही हा पूल लोकांसाठी वाहतुकीला खुला केल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली.

दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलीस आयुक्तालयात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. मात्र या आंदोलनामध्ये सोशल डिस्टनसचा मात्र फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा