Home ठळक बातम्या खासदार कपिल पाटील यांनी स्विकारला केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार

खासदार कपिल पाटील यांनी स्विकारला केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार

तळागाळातील ग्रामस्थांपर्यंत योजना पोचविण्याचा निर्धार

 

नवी दिल्ली दि.12 जुलै :
भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील यांनी सोमवारी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. देशाच्या तळागाळातील आणि दुर्गम भागातील ग्रामस्थांपर्यंत केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना पोचविण्याचा निर्धार व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे यावेळी सांगितले.

गेल्या आठवड्यात 7 जुलै रोजी खासदार कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेत त्यांनी प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर सोमवारी पाटील यांनी आपल्या राज्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
पंचायत राज खात्याच्या माध्यमातून देशातील 2 लाख 79 हजार ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी जाहीर केलेल्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घराला स्वतंत्र प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. या योजनेतून गावाचा विकास आराखडा करून त्याची टप्प्या-टप्प्यात अंमलबजावणी केली जाईल, पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या 3 स्तरावर विभाजन करून ग्रामीण भागात आदर्श ग्राम योजना राबविली जाईल. त्यातून गावाच्या विकासाचा चेहरा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘ग्रामविकास’ हा पायलट प्रकल्प काही राज्यात राबविणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तर ई- ग्रामपंचायत योजनेची अंमलबजावणी करून गावांना आधुनिक विकासाची जोड, स्वयंपूर्ण गावासाठी आधुनिक ग्रामविकासाचा रोड मॅप तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले.
स्वतंत्र भारताच्या 74 वर्षांनंतर ठाणे जिल्ह्याला प्रथमच केंद्रामध्ये मंत्रीपद देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवा इतिहास घडविला आहे. पंतप्रधानांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी लावण्यासाठी काम करणार असल्याचा विश्वासही राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

कपिल पाटील यांच्या अभिनंदनासाठी नवी दिल्लीत रीघ…
कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनासाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अक्षरशः रीघ लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानूसार नवनियुक्त मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्लीतच उपस्थित राहून कामकाजाची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे राज्यमंत्री कपिल पाटील पुढील महिनाभर दिल्लीतच मुक्कामी असणार आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा