Home ठळक बातम्या क्या बात है ; स्पेस टुरिझममध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज ‘न्यु शेफर्ड’च्या टिममध्ये...

क्या बात है ; स्पेस टुरिझममध्ये इतिहास रचण्यासाठी सज्ज ‘न्यु शेफर्ड’च्या टिममध्ये कल्याणची तरुणी

कल्याण दि.14 जुलै :
जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे (amazon) संस्थापक जेफ बेझोस (jeff bezos) यांची ‘ब्ल्यू ओरिजिन’ (blue origin) ही अमेरिकेस्थित स्पेस कंपनी (space company) अंतराळ सफरीच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवण्याच्या तयारीत आहे. येत्या 20 जुलैला ब्ल्यू ओरिजिन कंपनीतर्फे ‘न्यु शेफर्ड’ हे खासगी यान (roket) जेफ बेझोस यांच्यासह काही निवडक पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार असून हे यान बनवणाऱ्या टिममध्ये कल्याणच्या तरुणीचाही महत्वाचा वाटा आहे.

संजल गावंडे असं या तरुणीचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राहते. तिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलच्या तर वडील अशोक गावंडे हे केडीएमसीतील निवृत्त कर्मचारी आहेत. कल्याणात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या संजलने मॉडेल हायस्कूलमध्ये 10पर्यँतचे,12वीपर्यंत बिर्ला कॉलेज आणि त्यापुढील पदवीपर्यँतचे शिक्षण वाशीच्या फादर ऍग्नेल महाविद्यालयातून पूर्ण करत मुंबई युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्याचजोडीला जीआरई, टोफेलसारख्या कठीण परिक्षा देत त्यातही संजल चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झाली.

स्वप्नांच्या पंखाना खऱ्या अर्थाने बळ प्राप्त…

या सर्व परिक्षांच्या गुणांवर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे प्रवेश मिळवत पुढील शिक्षण सुरू केले. त्यातही प्रथम श्रेणीत पास होवून संजलने मॕकेनिकलमध्ये मास्टर पदवी प्राप्त केली. त्या बळावर तिला २०१३ मध्ये विस्काॕनसिनमधील फॉन्ड्युलेकच्या मर्क्युरी मरीन नामंकित कंपनीत काम सुरू केले. तिच्या मनासारखा जॉब मिळाल्यानंतरही तिचे मन आणि लक्ष सतत अवकाशाकडे लागले होते. आणि मग हे स्वप्न करण्यासाठी सुरू झाला त्या स्वप्नाच्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रवास. जॉब करता-करता शनिवार-रविवार सुट्टीमध्ये तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण चालू केले. आणि अखेर तिची मेहनत कामी आली. 18 जून 2016 ला तिला वैमानिक म्हणून लायसन्स मिळाले आणि तिच्या स्वप्नांच्या पंखाना खऱ्या अर्थाने बळ प्राप्त झाले.

नासा’मध्ये दिला इंटरव्ह्यू आणि…

कॕलिफोर्नियाच्या आँरेज सिटीमध्ये टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंट या नामंकित कंपनीत मॕकेनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून तिच्या कामाला सुरूवात झाली. रेसिंग गाड्यांचे इंजिन डिझाईन करण्याचे काम ती करत होती. त्यातही अवकाश भरारीचे स्वप्न आणि त्यासाठीचे प्रयत्न सुरूच असल्याने तिने नासा (National Aeronautics & Space Administration – NASA) मध्ये अर्ज केला होता. त्याठिकाणी तिचा इंटरव्ह्यू झालाही मात्र नागरिकत्वाच्या मुद्द्यावर तिची निवड होऊ शकली नाही. मात्र त्यामुळे निराश न होता संजलने नासा (National Aeronautics & Space Administration – NASA) साठी काम करणाऱ्या ब्ल्यू ओरिजिनला अर्ज केला आणि विशेष म्हणजे त्याठिकाणी तिची निवडही झाली. एवढ्यावरच तिचं कर्तृत्व थांबत नसून अंतराळ तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात ‘न्यु शेफर्ड’चे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड समजला जात आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टिममध्ये संजलचाही समावेश आहे. त्यामुळे आपल्या देशासह, संपूर्ण कल्याणच्या दृष्टीने ही एक अत्यंत मोठी गोष्ट असून संजलच्या या कर्तृत्वाचे करावे तितके कौतुक कमीच ठरेल.

काय आहे हे ‘न्यु शेफर्ड’…?
आतापर्यत अंतराळात केवळ उपग्रह किंवा त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीच यान सोडले जायचे. मात्र गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेत ‘स्पेस टुरिझम’ अर्थातच अंतराळ सफर नावाची नविन संकल्पना अस्तित्वात आली आहे. त्यासाठी ‘ब्ल्यू ओरिजिन’ ही कंपनी काम करत असून अंतराळ पर्यटकांसाठी त्यांनी ‘न्यु शेफर्ड’नावाचे यान 20 जुलैला अंतराळाच्या दिशेने झेपावणार आहे. यामध्ये अमेझॉन संस्थापक जेफ बेझोससह त्याचा भाऊ आणि आणखी काही पर्यटक असणार आहेत. विशेष म्हणजे या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत आहे तब्बल 28 मिलियन डॉलर (सुमारे 208 कोटी 78 लाख 34 हजार रुपये).

हे यान अवकाशात आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अंतराळ सीमेपर्यंतचा (Karman line – the internationally recognized boundary of space) अवघ्या 11 मिनिटांचा प्रवास करून पुन्हा पृथ्वीवर उतरणार आहे. त्यामूळेच न्यु शेफर्डच्या लाँचिंगशा आंतरराष्ट्रीय अंतराळ क्षेत्रासह जागतिक पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने जगाच्या इतिहासात एक नवा अध्याय रचला जाणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा