Home ठळक बातम्या आपल्या महायुतीची वज्रमूठ आता कोणीही तोडू शकणार नाही – केंद्रीय पंचायत राज...

आपल्या महायुतीची वज्रमूठ आता कोणीही तोडू शकणार नाही – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

कल्याणात महायुतीच्या मेळाव्याने प्रचाराचा प्रारंभ

कल्याण दि.16 एप्रिल :
भाजप शिवसेनेसोबत महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय आणि रासाप हे पक्षदेखील सहभागी झाले असून आपली वज्रमूठ कोणीही तोडू शकणार नाही असा विश्वास केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. कल्याण पश्चिमेतील महायुतीच्या पहिल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. (No one will be able to break the thunderbolt of our Grand Alliance – Union Minister of State for Panchayat Raj Kapil Patil)

बाबासाहेबांच्या संविधानाचा आणि बाबासाहेबांचा आदर केवळ मोदींनीच केला…
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त यापूर्वी संसदेत कधीही संविधनावर चर्चा झाली नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 125 व्या जयंतीनिम्मित संसदेत दोन दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चर्चा घडवून आणली. आणि हे लोकं आपली दिशाभूल करतात की आम्ही संविधान बदलणार आहोत. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान बदलण्याची ताकद केवळ आणि केवळ बाबासाहेबांमध्येच होती. देशाचे संविधान भाजपकडून बदलण्यात येणार असल्याचा अपप्रचार विरोधक करत असल्याचे कपिल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपला भरघोस मतांनी विजय निश्चित असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगाचे नेतृत्व करण्याची मोदींमध्ये क्षमता – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 वर्षे प्रचारक म्हणून काम केले, 15 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आणि त्यानंतर गेली दहा वर्षे या देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले आहे. त्यांनी देशातील प्रत्येक समस्या जाणून घेतली असून त्यांच्याकडे असणारा प्रदीर्घ अनुभव आणि राष्ट्रहितासाठी काम करण्याची भावना या सर्व गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणे अवघड आहे. म्हणूनच केवळ या देशाचे नव्हे तर जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता जर कोणामध्ये असेल तर ते नरेंद्र मोदी यांच्यामध्ये असल्याचे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी काढले. यंदा होणारी ही निवडणूक तुमच्या आमच्यासह तरुण पिढीचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. या पार्श्वभुमीवर कमळाचे बटन दाबून नरेंद्र मोदी यांना निवडून देण्याचे आवाहन रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केले.

यापुढे आमचे मतदान हे कमळालाच- राष्ट्रवादीचे उपध्याख प्रमोद हिंदुराव
गेल्या 10 – 15 वर्षांच्या कालावधीत आम्ही कधीही कमळाचे बटन दाबले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारांसोबत आम्ही सर्व जण विकासासाठी महायुतीमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे यापुढे आमचे मतदान हे विकासाच्या मुद्द्यावर कमळालाच पडेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महायुतीच्या बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा योग्य तो मान सन्मान ठेवण्याचे आवाहनही त्यांनी भाजप शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना केले.

कपिल पाटील यांना कल्याणातून 2 लाखांहून अधिक मताधिक्य मिळणार – आमदार विश्वनाथ भोईर
लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील हे 2 लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केला. महायुतीतील पक्षांमध्ये असणारे मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. त्यामूळे विरोधकांना आपल्याबद्दल जी काही गरळ ओकायची आहे ती ओकू द्या आपण प्रामाणिकपणे दिलेली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहनही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी केले.

काँग्रेस नेते प्रकाश मुथा यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश…
दरम्यान या महायुतीच्या मेळाव्यात काँग्रेस पक्षाचे नेते प्रकाश मुथा यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते मुथा यांनी काँग्रेसचा हात सोडून भारतीय जनता पक्षाचे कमळ हाती घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याची प्रतिक्रिया प्रकाश मुथा यांनी दिली.

महायुतीच्या या मेळाव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, मनसे नेते प्रकाश भोईर, कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार, राष्ट्रवादीचे जगन्नाथ आप्पा शिंदे, शिवसेना जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, भाजप कल्याण शहरप्रमुख वरुण पाटील यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा