Home क्राइम वॉच मुजोरी सुरूच : डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दांडक्याने मारहाण

मुजोरी सुरूच : डोंबिवलीत रिक्षा चालकाकडून प्रवाशाला दांडक्याने मारहाण

 

डोंबिवली दि.२८ मार्च :
रिक्षाचालकाच्या मुजोरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार डोंबिवलीत समोर आला आहे. जादा भाडे का घेता हे विचारल्यावरून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची संतापजनक घटना डोंबिवलीत घडली. त्यामुळे रिक्षा चालकांची ही मुजोरी आणखी किती काळ सहन करायची? प्रवाशांना कोणी वाली आहे की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

डोंबिवली पूर्वेच्या इंदिरा गांधी चौकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. गणेश तांबे असे या प्रवाशाचे नाव असून त्यांना इंदिरा गांधी चौकातून टाटा पॉवर येथे जायचे होते. त्यासाठी एका रिक्षा चालकाकडे त्यांनी विचारणा केली असता त्याने ३० रुपयांऐवजी ४० रुपये भाडे सांगितले. त्यावर तांबे यांनी रिक्षा चालकाला जास्त भाडे का सांगत आहात असे विचारले. त्याचा राग आल्याने रिक्षा चालकाने तांबे यांना थेट लाकडी दांडक्याने यांना मारहाण केली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली असून डोंबिवलीच्या रामनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत.

दरम्यान काही दिवसापूर्वी ऍम्ब्युलन्स चालकालाही रिक्षा चालकाने मारहाण केल्याची घटना डोंबिवलीत घडली होती. त्यापाठोपाठ आता प्रवाशालाही दांडक्याने मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून रिक्षा चालकांची ही मुजोरी आणखी किती सहन करायची असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा