Home ठळक बातम्या बोधपर ‘गोष्टीं’तून मुलांमध्ये रुजवणार सकारात्मक विचार; पोटे ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

बोधपर ‘गोष्टीं’तून मुलांमध्ये रुजवणार सकारात्मक विचार; पोटे ग्रुपचा स्तुत्य उपक्रम

 

कल्याण दि.20 एप्रिल :
संपूर्ण जगात आपला देश एक ‘युवा’ देश, तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. मात्र याच तरुणांच्या देशातील तरुण पिढीची मानसिकता नकारात्मक होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रातील नामांकित आणि नेहमीच चांगला समाज घडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या ‘पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशन’ने 8 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. ‘बोधपर गोष्टींच्या माध्यमातून आताच्या युवा पिढीमध्ये अधिकाधिक सकारात्मक विचार रुजवण्याचा अनोखा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती शिक्षण अभ्यासक बिपीन पोटे यांनी एलएनएनशी बोलताना दिली.

कोरोना आला आणि संपूर्ण जगाचेच नव्हे तर सगळ्यांच्या मनाचेही चित्र बदलून गेले. यात सर्वाधिक कोण भरडले गेले असतील किंवा जात असतील तर ते शालेय विद्यार्थी. एकीकडे कोरोनामुळे रद्द होणाऱ्या परीक्षा आणि दुसरीकडे पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार. या गोंधळाच्या वातावरणामूळे आजची ही युवा पिढी कधी लेक्चरसाठी तर कधी व्हिडीओ गेम खेळण्यासाठी तर कधी सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत वावरण्यासाठी दिवसभर ऑनलाईन. या सर्वांपासून या पिढीला दूर ठेवण्याची इच्छा असली तरी त्याशिवाय पर्यायही नव्हता. एकीकडे सुखवस्तू कुटुंबातील हे चित्र असताना दुसरीकडे शिक्षणाचा ध्यास असणारी कितीतरी गरीब, गरजू मुलं या तंत्रज्ञानापासून कोसो दूर हा विरोधाभासही असल्याचे पोटे म्हणाले.

आपल्याकडे पूर्वीपासूनच ‘गोष्टी सांगण्याला’ (story telling) फार महत्व आहे. मोबाईल- इंटरनेटच्या मोहजाळात अडकण्यापूर्वी आणि एकत्र असणारी कुटुंब पद्धती विभक्त होण्यापूर्वी आजी-आजोबा नावाची दोन विद्यापीठं आपल्या घरात होती. ज्यांच्याकडून या बोधपर गोष्टींच्या माध्यमातून आपसूकच घरातील मुलांवर चांगले संस्कार व्हायचे. सध्या 35 ते 40 वय असणाऱ्या मुलांची एक अख्खी पिढी या आजी आजोबांच्या बोधपर गोष्टी ऐकून घडली आणि मोठीही झाल्याचे बिपीन पोटे म्हणाले.

आणि आजच्या या नकारात्मक काळात मुलांमध्ये सकारात्मक आणि चांगले विचार रुजवण्याच्या दृष्टीने आम्ही ‘लॉकडाऊन स्टोरीज’चा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. या उपक्रमातून ही नविन पिढी चांगल्या गोष्टी ऐकेल, नविन काही तरी शिकेल, काही चांगल्या आणि नविन सवयी लागतील. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सामाजिक भान जागृत होण्यासह या मुलांना जबाबदारीची जाणीवही येईल अशी माहिती बिपीन पोटे यांनी दिली.
तर आठवड्यातून मंगळवार (tuesday) गुरुवार (thursday) आणि शनिवार (saturday) असे 3 दिवस संध्याकाळी 5 वाजता ऑनलाईन पध्द्तीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 40 मिनिटांच्या या सेशनमध्ये प्रत्येक वेळी एक नविन नामांकित व्यक्ती येऊन मुलांशी गोष्टीद्वारे संवाद साधणार आहे.

दरम्यान सध्याची सामाजिक परिस्थिती आणि मुलांमध्ये मानसिक स्तरावर झालेली उलथा पालथ पाहता पोटे ग्रुप एज्युकेशन आणि बिपीन पोटे यांनी घेतलेला हा पुढाकार नक्कीच वाखाणण्याजोगा आहे. काळाची गरज ओळखून आपण सर्वांनीच अशा सकारात्मक उपक्रमांना चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले पाहीजे.

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी या लिंकवर जाऊन करा नोंदणी…
https://us02web.zoom.us/meeting/register/tZUld-qrpzItHdJ4v-yWxkUhpFKtQWFmVgBC

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा