Home कोरोना केडीएमसीच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाची प्रसूती; माता आणि बालक दोघेही सुखरुप

केडीएमसीच्या कोवीड हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाची प्रसूती; माता आणि बालक दोघेही सुखरुप

 

कल्याण दि.19 एप्रिल :
कल्याणच्या लाल चौकी आर्ट गॅलरी कोवीड रुग्णालयातील आजचा दिवस काहीसा वेगळा होता. गेल्या काही दिवसांपासून सतत टेंशनखाली वावरणाऱ्या इथल्या आरोग्य कर्मचाऱ्यापासून ते डॉक्टरपर्यंतच्या चेहऱ्यावर आज आनंदाचे हास्य फुललेले पाहायला मिळाले. त्याला कारणही तसे स्पेशलच होते. कोवीडसाठी उपचार घेणाऱ्या महिलेने आज याठिकाणी एका गोंडस बाळाला जन्म दिला असून ही महिला आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.

आर्ट गॅलरी कोविड रुग्णालयात 7 महिन्यांची गर्भवती असणाऱ्या एका 37 वर्षांच्या महिला रुग्णावर उपचार सुरू आहेत. या महिलेची प्रकृती काहीशी गंभीर असल्याने आणि तिची ऑक्सिजनची पातळीही कमी झाल्याने आयसीयू वॉर्डमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत. कोवीडचे हे उपचार सुरू असतानाच या महिलेची नैसर्गिक प्रसुतीद्वारे तिने एका बाळाला जन्म दिला. तत्पूर्वी या महिलेची स्त्रीरोग तज्ञामार्फत तपासणीही करण्यात आली होती. नवजात बालकाचे वजन कमी असल्यामुळे त्यास लहान मुलांच्या रुग्णालयात (NICU) दाखल करण्यात आले आहे. तर या महिलेवर आर्ट गॅलरी कोवीड रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
दरम्यान महापालिकेच्या कोविड रुग्णालयात महिलेची सुखरुप प्रसुती होण्याची ही पहिलीच घटना असून डॉ. अमित गर्ग, डॉ. मुनीर आलम, डॉ. संदिप इंगळे आदी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही प्रसूती झाली. आजच्या या घटनेमुळे काही काळ का होईना पण सर्वांचेच चेहरे आनंदाने फुलून गेले होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा