Home ठळक बातम्या अभिमानास्पद ; कल्याण रेल्वे यार्डात मालगाड्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर

अभिमानास्पद ; कल्याण रेल्वे यार्डात मालगाड्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी महिलांच्या खांद्यावर

 

कल्याण रेल्वे यार्डात मालगाडीच्या परीक्षणासाठी 10 महिलांचे पथक नियुक्त

कल्याण दि.12 जून :
जसजसा काळ पुढे जातोय तसतशा महिलाही नवनविन क्षेत्र पादाक्रांत करताना दिसत आहेत. ज्या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी होती ती बहुतांश क्षेत्र आता महिलांनी आपल्या ताब्यात घेतली आहेत. यामध्ये आता आणखी एका क्षेत्राची भर पडल्याचे दिसत असून पुरुषांचे वर्चस्व असणाऱ्या या क्षेत्रात महिलांनी तितक्याच ताकदीने आपले काम करत आहेत. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालगाड्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी रेल्वेने महिलांच्या खांद्यावर दिली आहे. (Proud; womens team for maintenance and repair of freight trains at Kalyan Railway Yard

रेल्वेच्या विविध विभागात पूर्वीपासूनच महिला अत्यंत प्रभावीपणे कार्यरत आहेत. मात्र मालगाड्यांची देखभाल दुरुस्ती आणि परीक्षण एक असा विभाग होता की ज्याठिकाणी मानसिक ताकदीसह शारीरिक ताकदीचाही कस लागतो. मात्र अशा आव्हानात्मक कामाच्या विभागातही आता महिलांचे पथक तेवढ्याच ताकदीने काम करू लागले आहेत. विशेष म्हणजे मध्य रेल्वेवरील महत्वाचे जंक्शन असणाऱ्या कल्याण रेल्वे यार्डात हे पहिलेच पथक बनवण्यात आले आहे. 8 जूनपासून कल्याण रेल्वे यार्डात हे पथक कार्यरत असून याठिकाणी येणाऱ्या मालगाडीचे संपूर्ण तांत्रिक परीक्षण आणि देखभाल दुरुस्ती या पथकाकडून केली जात आहे.

आतापर्यंत मालगाडीच्या देखभाल दुरुस्ती- परीक्षणाची जबाबदारी प्रामुख्याने केवळ पुरुष कर्मचाऱ्यांवर सोपवली जायची. तर त्यांच्या या पथकात दोन ते तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असायचा. यामध्ये सहाय्यकाचे काम करता करता या महिला कर्मचारी इतक्या प्रशिक्षित झाल्या की त्यांच्या या कौशल्याची दखल त्यांच्या वरिष्ठांना घ्यावी लागली. आणि या महत्वपूर्ण कामासाठी स्वतंत्र पथक स्थापन करून आता त्यांच्यावर स्वतंत्रपणे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहिती कल्याण यार्डाचे मेकॅनिकल विभागाचे प्रमुख ए. जॉन यांनी दिली. तर रेल्वेने दिलेल्या संधीबद्दल या महिला कर्मचाऱ्यांनीही त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वेचे आभार मानले आहेत.

याआधीही महिलांना भलेही पुरुषांपेक्षा कमी लेखले – समजले जायचे. मात्र त्या पुरुषांपेक्षा कधीही कमी नव्हत्या की यापूढेही नसतील हेच पुन्हा एकदा या उदाहरणावरून सिद्ध झाले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा