Home ठळक बातम्या महिलेच्या प्रसूतीप्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन – आमदार विश्वनाथ...

महिलेच्या प्रसूतीप्रकरणी कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन – आमदार विश्वनाथ भोईर

नविन अधिकाऱ्यांनीही फिल्डवर उतरून काम न केल्यास हिसका दाखवणार

कल्याण दि.12 सप्टेंबर :
रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या महिलेच्या प्रसूतीप्रकरणी कल्याण पश्चिमेच्या स्थानिक आमदारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आपण आमदार म्हणून बाजूला होणार आणि कार्यकर्ते शिवसेना स्टाईलने प्रशासनाविरोधात आंदोलन करतील असा  इशारा आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे. तसेच केडीएमसीमध्ये नव्याने दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी फिल्डवर उतरून काम न केल्यास सेनास्टाईल हिसका दाखवण्याचा सज्जड दमही आमदार भोईर यांनी दिला आहे.

केडीएमसी प्रशासन वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णपणे फेल…

रुक्मिणीबाई रुग्णालयात घडलेला हा प्रकार कल्याणच्या वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारा प्रकार असून असे व्हायला नको होते. भलेही प्रसूतीगृह आपण वसंत व्हॅली येथे हलविले असले तरी इमर्जन्सीसाठी रुख्मिणीबाई रुग्णालयात काही तरी उपाययोजना करणे आवश्यक होते. मग ते आयुक्त असोत की मुख्य वैद्यकीय अधिकारी, घडलेल्या या घटनेवरून केडीएमसी प्रशासन वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णपणे फेल ठरल्याची संतप्त टिकाही आमदार भोईर यांनी यावेळी केली.

मग आपण आमदार म्हणून बाजूला होणार आणि कार्यकर्त्यांना…

आयुक्तांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत, त्यावेळी जे डॉक्टर होते त्यांची पूर्ण चौकशी करून मग कारवाई केली जाईल ते ठीक आहे. एकीकडे. आपण स्मार्ट सिटीकडे चाललो आहे, स्मार्ट सिटीच्या वल्गना केल्या जात असताना असे प्रकार होणे चुकीचे आहे. तर केडीएमसी आयुक्तांनी याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई न केल्यास आपण आमदार म्हणून बाजूला होणार आणि कार्यकर्त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलने मोठे आंदोलन करावे लागेल असा थेट इशाराच आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिला.

तर आपल्याला लोकांनी निवडून दिले असून त्यांच्यासाठी आपण बांधील आहोत. लोकांना जर सुविधा मिळणार नसतील, लोकांना त्यांचा हक्क मिळणार नसेल तर अशा प्रशासनाची गरज काय असा संतप्त सवालही त्यांनी केला.

नविन अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम न केल्यास त्यांनाही हिसका दाखवणार…

शासनाकडून बरेच अधिकारी येऊनही मोजकेच लोक सध्या फिल्डवर दिसत असल्याचा प्रकार आपल्याही लक्षात आला आहे. काम करताना हे जाणवते की अधिकारी भरपूर आणलेले आहेत पण ते असतात कुठे?  केबिनमध्ये की फिल्डवर ? मग हे अधिकारी काय करतात? असा संतप्त सवालही आमदार भोईर यांनी यावेळी केला. तर हे नविन अधिकारी  केडीएमसी आयुक्तांचे ऐकत नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला पाहिजे. या सर्व अधिकाऱ्यांना जनतेच्या सेवेसाठी आणण्यात आले आहे, त्यांना जनतेच्या करांच्या माध्यमातून पगार मिळतो, त्यांनी ही शहरात रस्त्यावर उतरून काम केले पाहिजे. अन्यथा त्यांनाही शिवसेनेचा काय हिसका आहे ते दाखवण्यात येईल अशा शब्दांत आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा