Home ठळक बातम्या नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे 27 गावांत कर आकारणी करा – आमदार राजू...

नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे 27 गावांत कर आकारणी करा – आमदार राजू पाटील यांची मागणी

कल्याण -डोंबिवली दि. 11 जानेवारी :

नवी मुंबईतील काही गावांमध्ये महापालिकेतर्फे विशेष धोरण राबविण्यात येत असून त्याच गावठाण धोरणावर केडीएमसी प्रशासनाने 27 गावांमध्ये कर आकारणी करावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. 27 गावांतील आणि पलावा टाऊनशीपमधील कर आकारणीबाबत आमदार पाटील यांनी केडीएमसी कर विभागाचे कर निर्धारक – संकलक विनय कुलकर्णी यांची भेट घेतली.

27 गावांत गावठाण भागात आधी 100 रुपये टॅक्स होता, त्याला आता 1 हजार रुपये येत असून केडीएमसीने इथल्या करामध्ये 3 प्रकारची विभागणी करण्याची आवश्यकता आमदार पाटील यांनी व्यक्त केली. तर 27 गावांत सरसकट कर आकारणी करण्याऐवजी गरजेपोटी मोठ्या केलेल्या घरांना जुन्या दराने कर आकारणी करण्याच्या पर्यायासारख्या 3 प्रकारची विभागणी अभ्यास करून लागू करा. ज्यामुळे ज्यांना शक्य होईल ते नक्कीच कर भरतील. नवी मुंबईत असणाऱ्या गावांना वेगळ्या प्रकारे कर लावलेले आहेत तशीच कर आकारणी 27 गावांत होण्याची मागणी केली असून केडीएमसी कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्तरावर ही सूचना मान्य केल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले.

त्याचबरोबर पलावा टाऊनशीपला परवानगी देताना त्यामध्ये घरं घेणाऱ्याना मालमत्ता करात 66 सवलतीची तरतूद शासनाने केली असून तसा शासनाचा 2018 चा जीआर असल्याचे ते म्हणाले. परंतु वारंवार सांगूनही त्यावर काहीच कार्यवाही होत नाही. आमदार रविंद्र चव्हाण यांनीही हा मुद्दा मांडला होता. आतापर्यंत इथल्या 25 हजार रहिवाशांनी 15 कोटी रुपये कर भरला असून 66 टक्क्यांच्या विचार करता 9 ते 10 कोटी कराचा अधिकचा भरणा केडीएमसीला केला असून अद्यापही सुधारित बिलं देण्यात येत का नाहीत? अशी विचारणाही त्यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांकडे केली. त्यावर एमएमआरडीएकडून यासंदर्भात आवश्यक त्या मार्गदर्शक सूचना नुकत्याच प्राप्त झाल्या असून लवकरच त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे येत्या महिन्याभरात हा मुद्दा निकाली निघून पलावातील रहिवाशांना मालमत्ता करात दिलासा मिळेल अशी आशाही आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार पाटील यांच्यासह मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, हर्षद पाटील यांच्यासह 27 गावांतील काही प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा