Home ठळक बातम्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुवर्ण युगाकडे वाटचाल : केंद्रीय पंचायती राज...

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची सुवर्ण युगाकडे वाटचाल : केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील

भिवंडी, दि. ४ जून :

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षांत नियोजनबद्ध लोकहिताच्या वेगवान विकासकामांमुळे सामान्य माणसाचे जीवन आनंदी होत आहे. जगभरात भारताचा लौकिक वाढला असून, देशाची सुवर्णयुगाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, आठ पदरी माजिवडा-वडपे बायपास, शहापूर-खोपोली महामार्ग आदींसह अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगविली, अशी भावनाही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. (The country is moving towards a golden age under the leadership of Narendra Modi: Union Minister of State for Panchayati Raj Kapil Patil)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ९ वर्षांत केलेले कार्य आणि महाजनसंपर्क अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी विविध कामांची माहिती दिली. यावेळी भाजपाचे आमदार महेश चौगुले, भिवंडी शहराध्यक्ष संतोष शेट्टी, कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, केडीएमसीचे माजी नगरसेवक वरुण पतीलझ दया गायकवाड आदींची उपस्थिती होती.

९ वर्षांत अशी झाली विकासकामे…
कोरोना महामारीपासून ८० कोटी नागरिकांना मोफत अन्न-धान्य, आयुष्मान भारत योजनेतून पाच कोटी रुग्णांवर पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार, कोरोनावर २२० कोटी मोफत डोस, साडेतीन कोटी कुटुंबांना पक्के घर, ११ कोटी ७२ लाख शौचालये, १२ कोटी घरात नळाने पाणी, जनऔषधी केंद्रांवर स्वस्तात औषधे, १ रुपयात सॅनिटरी नॅपकिन, साडेनऊ कोटी भगिनींना मोफत गॅस जोडणी, प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक ६ हजार रुपये, खतांच्या किंमती कायम आदी महत्वपूर्ण काम करून गरीबांसाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणासाठी कार्यरत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केले. केंद्र सरकारच्या प्रत्येक निर्णयात गरीबांच्या हिताचा व कल्याणाचा विचार केला गेला, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले.

पंतप्रधान मोदी यांचे `न भूतो न भविष्यति’ कार्य…
जम्मू-काश्मिरातून ३७० कलम रद्द, ५२८ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले अयोध्येतील श्री राम मंदिर, केदारनाथ धाम पुनर्निर्माण, काशी विश्वनाथ व सोमनाथ कॉरिडॉर आदींबरोबर लोकशाहीचे नवे मंदिर असलेली नवी संसद आदी `न भूतो न भविष्यति’ कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतच पार पडले, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले.

देशातील उद्योग क्षेत्राला मिळाली अशी चालना…
देशातील उद्योग क्षेत्राला चालना मिळाली असून, निर्यातीत वाढ झाली. नऊ वर्षांत ७४ नवीन विमानतळ, तब्बल ५३ हजार ८६८ किमी नवीन महामार्ग, १११ नवे जलमार्ग, जागतिक दर्जाच्या प्रवासासाठी देशातून २० व महाराष्ट्रातून पाच वंदे भारत एक्सप्रेस, १५ नवी मेडिकल कॉलेज, मेडिकलच्या जागांमध्ये ७० हजार वाढ, १५ एम्स हॉस्पिटल, सात आयआयटी, १३ आयआयएम, ३०९ विद्यापीठे सुरू झाली.

भारताकडे पाहिले जात आहे विश्वगुरू म्हणून…
जागतिक अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकापर्यंत भरारी घेतली. जगात भारताचा नावलौकिक वाढला असून, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह प्रमुख देशांच्या राष्ट्रप्रमुखांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान केला जातो. जगभरात विश्वगुरू म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. त्यामुळे पंतप्रधानपदावर नरेंद्र मोदी ही देशाची गरज आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

दोन लाख ३८ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा विकास…
पंचायती राज विभागाच्या माध्यमातून देशातील दोन लाख ३८ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींचा विकास केला जात आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून गावे स्मार्ट करण्याचे कार्य सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने निश्चित केलेल्या सतत विकास लक्ष्यांनुसार (एलएसडीजी) ग्रामपंचायतींमार्फत ९ लक्ष्ये पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठी १३ लाखांहून अधिक पदाधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले. वित्त आयोगाने दोन लाख कोटी रुपयांहून अधिक अनुदाने ग्रामपंचायतींना दिली. स्वामित्व योजनेत सव्वा कोटी संपत्ती कार्ड, ३० हजार पंचायती भवन, दोन लाख ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फाईबर कनेक्टिविटी दिली गेली, असेही कपिल पाटील यांनी नमूद केले.

भिवंडी मतदारसंघात ९ वर्षांत वेगाने झाली ही कामे…
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध भागात नऊ वर्षांत वेगाने प्रगती झाली. कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग, ८ पदरी माजिवडा ते वडपे बायपास, शहापूर-खोपोली नवा राष्ट्रीय महामार्ग, तानशेत व उंबरमाळी स्थानकाला अधिकृत मंजूरी, नवे चिखलोली रेल्वेस्थानक, वासिंद परिसरातील ४२ गावांना जोडणारा आरओबी, बदलापूर होम प्लॅटफॉर्म आदी कामांची अनेक वर्षांपासून प्रतिक्षा होती. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो, वसई-ठाणे- कल्याण जलमार्ग, हर घर जल योजनेतून मतदारसंघातील गावांमध्ये पाणीयोजनांसाठी कोट्यवधींचा निधी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण भागात कॉंक्रीट रस्ते, माळशेज घाटात कॉंक्रीट रस्ता, कल्याण-बदलापूर तिसऱ्या व चौथ्या मार्गाला मंजुरी, कल्याण-कसारा रेल्वेमार्गावर तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावर पाच मोठ्या पुलांची कामे आदी कार्य केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारमुळेच झाले. किसान सन्मान योजनेचा भिवंडी लोकसभा मतदारसंघात १ लाख ७५ हजार शेतकरी लाभ घेत आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नमूद केले. भिवंडी मतदारसंघात १२१ आदिवासी गावांचा आदर्श गावे म्हणून, तर देशातील पहिले कार्बन न्यूट्रल आदिवासी गाव भिवंडीत उभारले जात आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील…
भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे मूळ गाव मुरबाड आहे. भारतात रेल्वे सुरू होण्यासाठी दिवंगत नाना शंकरशेठ यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यांच्या मूळ गावातील रहिवाशांना रेल्वेसाठी प्रतिक्षा करावी लागत होती. अनेक दशकांपासून मुरबाडपर्यंत रेल्वेची मागणी पूर्ण झाली नाही. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत मुरबाड रेल्वेला हिरवा कंदील मिळाला. या रेल्वेसाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्याचा ५० टक्के वाटा उचलणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात भाजपा-शिवसेनेचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्याच दिवशी मुरबाड रेल्वेच्या ५० टक्के खर्चाची हमी दिली होती, अशी आठवण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितली.

प्रथमच रेल्वे प्रकल्पाची १५ दिवसांत मोजणी…
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाची मोजणी पंधरा दिवसात पूर्ण झाली. एका दिवसात जमिनीची मोजणी होणारा हा पहिलाच रेल्वे प्रकल्प आहे, याबद्दल सर्व अधिकाऱ्यांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आभार मानले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा