Home ठळक बातम्या राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले

राज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले

 

सिरियलकडे वळणाऱ्या नविन नाट्य कलाकारांबाबत चिंता व्यक्त

डोंबिवली दि.23 ऑक्टोबर :
नाट्यक्षेत्राला पूर्वीप्रमाणे उभे करायचे असल्यास राज्य शासनाने विविध सोयी सुविधा वाढवून देण्यासह 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी अशी अपेक्षा सुप्रसिद्ध नाट्यकर्मी आणि कलाकार प्रशांत दामले यांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे बंद झालेली राज्यातील नाट्यगृह आज तब्बल 6 महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा सुरू होत आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दामले यांनी ही अपेक्षा व्यक्त केली.

कोरोनामुळे नाट्यक्षेत्राचे जे नुकसान झाले त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची कधीच मागणी केली नाही. त्याऐवजी राज्य शासनाने आम्हाला टप्प्याटप्प्याने सोयी – सुविधा वाढवून द्याव्या, तसेच 2022 पर्यंत राज्य शासनाने नाट्यगृहांच्या भाड्यात सूट देण्याची अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्रासाठी शासनाने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यास डिसेंबर 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी जसे होते तसे उभे राहिल असा विश्वासही प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केला.
तर नाट्यक्षेत्र बंद असल्याने अनेक नवनवीन नाट्य कलाकार, दिग्दर्शक, लेखक हे सध्या मोठ्या प्रमाणात सिरियलकडे वळाले असल्याची चिंता दामले यांनी यावेळी व्यक्त केली. नाट्यक्षेत्राला सध्या एका मोठ्या संक्रमणाला सामोरे जावे लागत असून राज्य सरकारने सुविधा द्याव्यात. या सुविधा कागदावर असल्याने नाट्यक्षेत्र पूर्वीप्रमाणे उभे राहण्यास त्यांचा नक्कीच फायदा होईल असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सावित्रीबाई फुले नाट्यगृह हाऊसफुल्ल…’
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेपासून अर्थात होळीपासून बंद झालेली राज्यातील नाट्यगृहे आजपासून (23 ऑक्टोबर) ऑक्टोबरपासून पुन्हा उघडली आहेत. तर राज्यातील पहिल्या नाट्यप्रयोगाचा मान सांस्कृतिक उपराजधानी असणाऱ्या डोंबिवलीला प्राप्त झाला आहे. येथील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून आले. या प्रयोगासाठी कल्याण डोंबिवलीसह मुंबई, ठाणे, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरातील नाट्यप्रेमी सहकुटुंब दाखल झाले होते.

आता कोरोना नव्हे…तर टाळ्यांची लाट येऊ दे..”
दरम्यान हा नाट्यप्रयोग सुरू होण्यापूर्वी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात असणाऱ्या नटराजाचे पूजन करण्यात आले. तसेच ‘यापूढे आता कोरोनाची नव्हे तर नाट्यप्रेमींच्या टाळ्यांची लाट येऊ दे ‘ असे गाऱ्हाणेही प्रशांत दामले यांच्यासह नाट्यप्रेमींकडून घालण्यात आले.

या नाट्यप्रयोगाला केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, सचिव संजय जाधव यांच्यासह अनेक नाट्यप्रेमी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा