Home ठळक बातम्या “मेगा टाऊनशिप मंजूर करताना विकासकाला अंडरपास किंवा उड्डाणपूल बांधणे बंधनकारक करा”

“मेगा टाऊनशिप मंजूर करताना विकासकाला अंडरपास किंवा उड्डाणपूल बांधणे बंधनकारक करा”

मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

डोंबिवली दि. 23 ऑक्टोबर :
राज्यातील विविध मुख्य शहरांमध्ये मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु असून कल्याण ग्रामीण मतदारसंघातही लोढा पलावा, रुणवाल मायसिटी, रुणवाल गार्डन, अनंतम् रिजन्सीसारखे मेगा टाऊनशिप प्रकल्प सुरु आहेत. त्यातील काही प्रकल्प कार्यरत झाले असून त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील लोकवस्तीमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. तसेच हे सर्व प्रकल्प रेल्वे स्टेशनपासून लांब असल्याने यातील बहुतांश रहिवासी नोकरी-व्यवसायानिमित्त रस्ते वाहतुकीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या प्रकल्पांना जोडणाऱ्या कल्याण-शिळ आणि काटई-बदलापूर-तळोजा रस्त्यावर नेहमीच वाहतुक कोंडी होत असते. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी उड्डाणपूल अथवा अंडरपास बांधणे विकासकाला बंधनकारक करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात कल्याण – शिळ मार्गावर सध्या लोढा पलावा, कासा रिओ, रुणवाल गार्डन, रुणवाल मायसिटी, अनंतम् रिजन्सी हे सर्व मेगा टाऊनशिप प्रकल्प उभारण्यात आले आहेत. तर लोढा लेकशोर प्रकल्प काटई-बदलापूर रस्त्याला जोडण्यात आला आहे. ज्या गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये प्रवेश करण्यासाठी बायपासही उपलब्ध नाही. आधीच कल्याण-डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, अबरनाथ, उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्याशिवाय पर्याय नसून या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न नेहमीचा बनला आहे. त्यात या मेगाटाऊनशीपमूळे अधिक भर पडत असल्याचे आमदार राजू पाटील म्हणाले.

तर अशा मेगा टाऊनशिपला परवानगी देताना वाढणारी लोकवस्ती गृहीत धरुन प्रकल्पाच्या ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास करणेबाबत धोरण आखणे आवश्यक आहे. मात्र ते न केल्यामूळे आज कल्याण – शिळ मुख्य रस्त्यावर वाहतुककोंडी होताना दिसते. प्रकल्प कार्यरत होऊन १०-१० वर्षे झाली तरी उड्डाणपूल किंवा अंडरपास मंजूर होत नाही आणि मंजूर झाल्यास निधीअभावी पूर्ण होण्यास पुढील १० वर्षाचा काळ लागतो. अशावेळी सर्वसामान्य नागरिकांना सततच्या वाहतुककोंडीचा सामना करावा लागतो, तोपर्यंत विकासक प्रकल्प पूर्ण करुन निघून गेलेले असतात. तरी या महत्त्वाच्या विषयावाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.
हा विषय केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघापुरता मर्यादित नसून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणेसह राज्यातील विविध शहरांमध्ये असेच प्रकल्प सुरु आहेत आणि सगळीकडे याच अडचणी निर्माण झाल्या आहेत, भविष्यात होणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पामध्ये राहणाऱ्या नागरिकांसह स्थानिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. तरी याबाबत तातडीने निर्णय घेत मेगा टाऊनशिपसाठी परवानगी देताना वाहतुक कोंडीच्या दृष्टीकोनातून विकासकाला प्रकल्प ठिकाणी उड्डाणपूल अथवा अंडरपास बंधनकारक करावा आणि त्याचा अतिरिक्त फायदा संबंधित विकासकांना त्या त्या प्रकल्पामध्ये देण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवली महापालिकेच्या 23 ऑक्टोबर 2021 रोजीच्या लसीकरण केंद्रांची माहिती
पुढील लेखराज्य शासनाने 2022 पर्यंत नाट्यगृहांच्या भाड्यात सूट द्यावी – प्रशांत दामले

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा