Home ठळक बातम्या अखेर प्रतिक्षा संपली; डोंबिवलीतील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

अखेर प्रतिक्षा संपली; डोंबिवलीतील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन

केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते उद्घाटन

डोंबिवली दि.12 ऑक्टोबर :
डोंबिवलीच्या एमआयडीसी पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्राचे (POPSK) आज केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या पासपोर्ट सेवा केंद्रासाठी कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पाठपुरावा करत होते. त्यामूळे गेल्या काही वर्षांपासून असणारी पासपोर्ट सेवा केंद्राची प्रतिक्षा आज अखेर संपुष्टात आली. या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे केवळ कल्याण डोंबिवलीच नव्हे तर आसपासची शहरं आणि ग्रामीण भागातील लाखो नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.

केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांच्याकडून खासदार डॉ. शिंदे यांचे कौतूक

पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याच्या छोटेखानी भाषणात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे कौतुक केले. हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करणे ही केवळ मतदारसंघाची मागणी नव्हती. तर त्यापेक्षा अधिक खासदार डॉ. शिंदे यांनी त्यासाठी केलेले झुंजार प्रयत्नांमूळे हे केंद्र सुरू होऊ शकल्याचे कौतुक केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी केले. तर डोंबिवलीत पोस्ट ऑफिसमध्ये सुरू झालेले हे 428 वे पासपोर्ट सेवा केंद्र असून गेल्या 6 महिन्यात देशांत तब्बल 6 लाख पासपोर्ट वितरित केल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी दिली. देशाच्या जनतेला केंद्रस्थानी ठेवून कशाप्रकारे काम करता येऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राच्या माध्यमातून केंद्र सरकारने घालून दिला आहे. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रस्तावाबाबत आपण सकारात्मक विचार करून लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासनही केंद्रीय राज्यमंत्री चौहान यांनी यावेळी दिले.

पासपोर्ट सेवा केंद्राचा 50 लाख लोकांना फायदा – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे..
केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चौहान यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचा लाभ तब्बल 50 लाख नागरिकांना होणार असल्याचा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. या केंद्रामुळे लोकांना आता ठाण्याला जायची आवश्यकता भासणार नाही. डोंबिवली एमआयडीसी पोस्ट ऑफिसमधील पासपोर्ट सेवा केंद्रात नविन पासपोर्ट बनवण्यापासून ते पासपोर्ट नूतनीकरणापर्यंत सर्व सेवा मिळणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. तत्कालीन परराष्ट्र मंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांनी डोंबिवलीतील या पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर जागेच्या अडचणी आणि त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे हे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे काम लांबणीवर पडले होते. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा अधिवेशनादरम्यान आपण दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांनतर वेगाने चक्र फिरत 4 वर्षांपासून रखडलेल्या या महत्वाकांक्षी कामाचे अवघ्या काही महिन्यातच उद्घाटन झाल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंकडून विरोधकांचाही खरपूस समाचार…

आपल्याला लोकांनी काम करायला निवडून दिले असून तर इथल्या विरोधकांना लोकांनी फक्त विरोध करायला निवडून दिले असावे असे सांगत खासदार डॉ. शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. आपल्या मतदारसंघात मोठ्या योजना, पायाभूत सुविधा कशा निर्माण होती यासाठी आपण झटत आहोत. आपल्या मतदारसंघात काहीशे कोटींची पायाभूत सुविधांची कामे सुरू असून हजार कोटींची कामे मंजूर झालेली आहेत. आमची ही कामे अशीच सुरू राहतील, आपण केवळ व्हिडीओ बनवण्याचे काम करा, आम्ही ती कामे पूर्ण करण्याचे काम करत राहू. आपण केवळ विरोध करण्याचेच काम करत राहा आणि आपल्या विरोधातून आमची कामे लोकांपर्यंत पोचवत राहा असा चिमटाही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी काढला.

या उद्घाटन समारंभाला मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी डॉ. राजेश गावंडे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिक संपर्क प्रमूख भाऊसाहेब चौधरी, माजी स्थायी समिती सभापती रमेश म्हात्रे, दिपेश म्हात्रे, डोंबिवलीचे एसीपी जे.डी. मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा