Home कोरोना क्या बात है: कल्याण आणि जुन्नरमधील दोघा तरुणांनी ‘असे’ वाचवले शेकडो कोवीड...

क्या बात है: कल्याण आणि जुन्नरमधील दोघा तरुणांनी ‘असे’ वाचवले शेकडो कोवीड रुग्णांचे प्राण

कल्याण दि.27 एप्रिल :
सध्याच्या परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, रेमडीसीवीर इंजेक्शनसोबत आणखी कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ‘प्लाझ्मा’. दररोज आढळणाऱ्या आणि बऱ्या होणाऱ्या हजारो रुग्णांच्या तुलनेत ‘प्लाझ्मादाना’साठी अगदी काही व्यक्तीच पुढाकार घेत असल्याने प्लाझ्माचीही मोठी समस्या भेडसावत आहे. मात्र कल्याण आणि जुन्नरमधील दोघा तरुणांनी सुरू केलेल्या रक्त आणि प्लाझ्मादानाच्या लढ्यामूळे आज शेकडो कोवीड रुग्णांचे प्राण वाचण्यासाठी मदत झाली आहे. कल्याणातील किशोर सातपुते आणि जुन्नरमधील ऋषी साबळे अशी या दोघांची नावे आहेत.

कल्याणचा किशोर सातपुते हा एका नामांकित फार्मा कंपनीत नोकरीला होता. तर जुन्नरचा ऋषी साबळेची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. किशोरला तर रक्तदान हा केवळ शब्द ठाऊक. मात्र एका ‘गर्भवती महिलेला रक्त पाहीजे असल्याच्या’ मेसेजने किशोरचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. किशोरने हा मेसेज सहजपणे सोशल मीडियावर टाकला आणि त्यामुळे संबंधित महिलेला रक्त उपलब्ध होऊन तिचा आणि बाळाचा दोघांचाही जीव वाचण्यास मदत झाली. या घटनेचा किशोरच्या मनावर इतका खोल परिणाम झाला आणि त्यातूनच मग पुढे रक्तदानासाठी काम करणाऱ्या ऋषी साबळेशी ओळख झाली आणि मग ‘लढा रक्तदाना’चा ही मोहीम,चळवळ उभी राहिली. किशोर आणि ऋषीने वर्षभरापूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षरशः वाहून घेतल्याप्रमाणे ‘लढा रक्तदाना’साठीचे काम सुरू केले. ज्यातून दोघांनीही आजपर्यंत तब्बल 700 जणांना रक्त तर 500 जणांना प्लाझ्मा उपलब्ध करून देत जीव वाचवला आहे. किशोरला तर आईची तब्येत आणि या कामासाठी देण्यासाठी वेळ मिळत नसल्याने नोकरीवरही पाणी सोडावे लागले आहे. तर किशोरचे हे सामाजिक काम बघून त्याला कोणतीही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून त्याचे काही मित्र त्याला जमेल तशी मदत करत आहेत. आजच्या कठीण काळात किशोर आणि ऋषीने केलेल्या कामाची निश्चितच तोड नाहीये.

मात्र सध्या एवढ्या मोठ्या संख्येने कोवीड रुग्ण सापडत असले तरी प्लाझ्मादानासाठी कोणी पुढाकार घेत नसल्याची खंत किशोरने एलएनएनकडे बोलून दाखवली. इतरांनी प्लाझ्मा दिला म्हणून ते आज बरे होऊ शकले. त्यामुळे त्यांनीही सामाजिक बांधिलकी जपत इतरांना प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येण्याची गरज असून दुर्दैवाने तसे होताना दिसत नसल्याचे किशोरने सांगितले.
तर येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील तरुण तरुणींना कोवीड लस देण्यात येणार आहे. परंतू लस घेतल्यानंतर 1 ते 2 महिने रक्तदान करता येत नाही. तसे झाल्यास आपल्याकडे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर लस घेण्यापूर्वी अधिकाधिक युवा पिढीने रक्तदान करण्याचे आवाहनही किशोरने केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा