Home ठळक बातम्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार – कपिल पाटील

महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या साथीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार – कपिल पाटील

भिवंडीत घेतली हजारो कार्यकर्त्यांची सभा

भिवंडी दि.13 मे :
आगामी काळातील विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांना पूर्वीपेक्षा दहापट अधिक ताकद देऊन पक्ष मजबूत केला जाईल. आपण फिनिक्स पक्षाप्रमाणे असून कार्यकर्त्यांच्या साथीने राखेतून पुन्हा भरारी घेऊ असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त करत भिवंडी शहरातील दोन्ही विधानसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.(will-take-charge-like-the-phoenix-with-the-help-of-mahayuti-workers BJP Kapil Patil)

भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या अनपेक्षित पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते. या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हॅट्रीकनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकात जल्लोष करण्यात आला. त्यावेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गर्दी केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुढील पाच वर्षांत होणार्‍या कार्यातून गौरवशाली इतिहास घडविला जाईल. भाजपासह महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मोदीजींचा विकास हा घराघरांपर्यंत पोचवावा असे आवाहन कपिल पाटील यांनी केले. तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या अनपेक्षित पराभवाने आलेली मरगळ दूर करून विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत विजयासाठी सज्ज होण्याचे त्यांनी आवाहन केले.

भिवंडीत `तो’ पॅटर्न चालल्यानंतरही सर्वांनी प्रामाणिकपणे काम केले असते, तर आपली हार झाली नसती. देशात अनेक ठिकाणी चाललेल्या पॅटर्नप्रमाणे भिवंडी मतदारसंघात`घरभेदी’ हा पॅटर्नही चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विचारांचा हा पराभव असून त्यात योगदान देणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असा इशाराही पाटील यांनी दिला. तर पक्षाच्या पराभवासाठी कारणीभूत ठरलेल्या लोकांना खड्यासारखे बाजूला करून भाजपाला मजबूत करण्याचे कार्य करण्याची ग्वाही कपिल पाटील यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून भिवंडीच्या विकासासाठी,नागरिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता झटत राहील. आगामी निवडणुकांच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्यांना ताकदही दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपाचे भिवंडी पूर्व विधानसभा प्रमुख संतोष शेट्टी, भाजपाचे शहराध्यक्ष हर्षल पाटील, माजी नगरसेवक सुमित पाटील, जितेंद्र डाकी यांच्यासह पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी भिवंडीतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मोदी…मोदीचा गजर केल्याचे दिसून आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा