खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘विकास दशक’ कार्य अहवालाचे प्रकाशन
डोंबिवली दि.22 एप्रिल : डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने आपण आदर्श लोकप्रतिनिधी आणि आदर्श खासदार दिल्लीला पाठवला असल्याचे गौरवोद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm Eknath Shinde)यांनी डोंबिवलीत काढले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गेल्या १० वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (PWD minister Ravindra chavhan), मनसे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju patil) आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलखुलासपणे खासदार डॉ. शिंदे (mp Dr Shrikant shinde) यांनी १० वर्षात केलेल्या विकासकामांचे कौतुक केले. (You have sent ideal people representatives, MPs to Delhi; Appreciation of Dr Shrikant Shinde by Chief Minister Eknath Shinde)
आज आपण ट्रिपल रोलमध्ये…
आज मी आपल्यासमोर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुख्य नेता, या राज्याचा मुख्यमंत्री आणि तुमच्या खासदाराचा पिता या ट्रिपल रोलमध्ये उभा आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाबद्दल मी समाधानी असून त्यांची विकासाची गाडी राईट ट्रॅकवरच नाही, तर फुल स्पीडमध्ये आहे. डॉ. श्रीकांत शिंदे आता केवळ खासदार नाही, तर संसदरत्न असून त्याचाही आपल्याला वडील म्हणून अभिमान असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर कल्याण लोकसभा मतदारसंघाने त्यांना खासदार म्हणून स्वीकारलं असून बाळासाहेबांचे आशीर्वाद, मोदीजींनी ठेवलेला विश्वास आणि मतदारांचा आशीर्वाद तसेच महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांची घेतलेल्या मेहनतीमुळे मतदारसंघात डोंगराएवढी कामे करणे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर चौफेर विकास कसा करायचा, याची नस त्यांना कळलेली असून आपण २०१४ मध्ये त्यांना निवडून दिले, २०१९ मध्ये निवडून दिले आणि २०२४ मध्येही पुन्हा निवडून देणारच असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
लोकांनी ठरवावे भविष्यात कसा विकास हवा आहे – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे
देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना गेल्या १० वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. या १० वर्षात लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केला आणि गेल्या १० वर्षाचे प्रगतीपुस्तक आज जनतेसमोर ठेवण्याचे काम करतोय, असे यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच आता लोकांनी ठरवायचे आहे, की भविष्यात आणखी कशा पद्धतीने विकास हवा आहे, असे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर गेल्या १० वर्षात लोकसभेत केलेल्या कामांचे मुख्यमंत्री आणि जनतेसमोर सादरीकरण करत कामांची सखोल माहितीही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. देशात रेल्वेचे सर्वाधिक काम २०१४ ते २०२४ या १० वर्षात झाले असून कल्याण लोकसभेतही मोठ्या प्रमाणात कामे झाल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. रेल्वेची पाचवी सहावी मार्गिका, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग, सरकते जिने, होम प्लॅटफॉर्म अशा अनेक सुविधा देण्यासह रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी पक्क्या रस्त्यांचे जाळे तयार केल्याचे यावेळी खासदार शिंदे म्हणाले. रिंग रोड, विठ्ठलवाडी कल्याण उन्नत महामार्ग मोठागाव माणकोली पूल, ऐरोली काटई फ्री वे, तळोजा मेट्रो असे अनेक गेमचेंजर प्रकल्प कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झाले, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. आरोग्य सुविधेतही कल्याण लोकसभेत सर्वोत्तम सुविधा दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. उल्हासनगरमधील मोफत सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, अंबरनाथमध्ये मेडिकल कॉलेज, शासकीय रुग्णालयांमध्ये आधुनिक सुविधा पुरवणे अशी कामे केल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
विरोधकांचा शेलक्या शब्दांत समाचार
श्रीकांत शिंदे डॉक्टर असले आणि आपण डॉक्टर नसलो तरी आपण अनेक सर्जरी केलेल्या आहेत. काही लोकांचे गळ्याचे पट्टे गायब झाले, काही लोकं फास्ट फिरायला लागले, चालायला लागले, तेदेखील गरजेचे होते. जेव्हा आम्ही २०२२ ला सरकार स्थापन केलं, त्यावेळची परिस्थिती आपल्याला माहीत आहे. शेवटी सहकार्य, योगदान मागायचे असते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सहकार्य मागण्यासाठी कशाला काही वाटायला हवे. विकासासाठी आम्ही सहकार्य मागत असतो. मात्र अहंकारी लोकं आपल्या इगोसाठी राज्याचे नुकसान करतानाही आपण बघितल्याची टिकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणाचेही नाव न घेता केली. तसेच तर खरे वाघ आम्हीच असून काही नकली वाघ कल्याण डोंबिवलीमध्ये येऊन पोकळ डरकाळ्या फोडून गेले. परंतु हा एकनाथ शिंदे रिंगमास्टर असून वाघाचे कातडे पांघरलेल्या शेळ्या आपण चांगल्याप्रकारे ओळखून असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा खरपूस समचार घेतला.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे चीज केले – रविंद्र चव्हाण
गेल्या १० वर्षांपासून शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत केली, त्या मेहनतीचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी चीज केले. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र अशी त्यांची ओळख होती. मात्र त्यांनी आपल्या कामातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केल्याची कौतुकाची थाप सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघात मध्यमवर्गीय कुटुंब सर्वाधिक आहेत. कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांच्या सर्व समस्या त्यांनी जाणून घेऊन इथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नक्की काय केलं पाहिजे, त्या कामांचा धडाका लावल्यामुळे तुमच्या आणि आमची सर्वांची जबाबदारी ही फार वाढल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे काम – प्रमोद हिंदुराव
भविष्याचा वेध घेण्याची किमया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केली आहे. त्याला साथ देण्याचे काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून होत असल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी व्यक्त केले. गेल्या १० वर्षांत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांची पोचपावती या कार्य अहवालाच्या रूपाने आपल्याला दिसून येत आहे. केंद्र सरकारच्या धोरणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रात कामे करण्यास प्राधान्य दिले आहे, असे म्हणत एमएमआरडीएप्रमाणे कल्याण आणि आसपासच्या परिसरासाठी प्राधिकरण करावे, अशी मागणी हिंदुराव यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे हॅटट्रिक करणार – मनसे आमदार राजू पाटील
या ट्रीपल इंजिन सरकारला आता मनसेचे खरे इंजिन लागले असून आता तर ही महायुती आणखी स्पीड पकडेल. त्यामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे येत्या निवडणुकीत नक्कीच हॅटट्रिक करतील, असा ठाम विश्वास यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला. खासदार डॉ. शिंदे यांना जशी हनुमान चालीसा पाठ आहे, तसेच कल्याण लोकसभेतले प्रश्न, त्यांनी केलेली सर्व कामेही पाठ आहेत. त्यांचे निश्चितच कौतुक केले पाहिजे, असे सांगत मनसे संपूर्ण ताकदीने काम करून विजयापर्यंत पोहोचण्यासाठी खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही मनसे आमदार राजू पाटील यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, मनसेचे आमदार राजू पाटील, कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, रिपाई आठवले गटाचे नेते प्रल्हाद जाधव, रिपाई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, पीआरपी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे, प्रवक्ते किरण सोनावणे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, राष्ट्रवादी प्रदेश सचिव भरत गंगोत्री, महिला आघाडी जिल्हाप्रमुख लता पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.