कल्याण-डोंबिवली दि.18 मे :
तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात कल्याण आणि डोंबिवलीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात दोन्हीं ठिकाणी तब्बल 210 झाडं जमीनदोस्त झाली असून 13 घरांसह 8 गाड्यांचे नुकसान झाल्याची माहिती केडीएमसीचे मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली.
तौक्ते चक्रीवादळाने काल दिवसभर कल्याण आणि डोंबिवलीमध्ये अक्षरशः हाहाकार माजवला. सकाळी 11 नंतर सुटलेले जोरदार वारे आणि सोबतीला पावसाचीही हजेरी. या दोन्हीच्या कात्रीत काल कल्याण डोंबिवलीकर चांगलेच सापडलेले पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी झाडं पडण्यासह घरांचे पत्रे उडाले, इमारतीच्या गच्चीवरील वेदर शेड उडाल्या, विजेचे खांब वाकले, वीज वाहिन्या तुटल्या अशा असंख्य घटना कल्याण डोंबिवलीत घडल्या.
तर एकाच वेळी एवढ्या ठिकाणी झाडं पडल्याच्या घटना घडल्याने महापालिका अग्निशमन दल काल सकाळपासून अखंडपणे आपले कर्तव्य पार पाडत आहे.
तर अद्यापही झाडं पडलेली अशी काही ठिकाणे आहेत ज्याठिकाणी अद्याप अग्निशमन दलाला जायला उसंत मिळालेली नाही. तरी नागरिकांनी घाबरून न जाता अग्निशमन दलाला सहकार्य करावे, आम्ही लवकरात लवकर संबंधित ठिकाणी पोहचण्याचा प्रयत्न करू असे आवाहनही अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांनी केले आहे.