Home ठळक बातम्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ : 106 टेबल्सवर 29 फेऱ्यांद्वारे होणार विधानसभानिहाय मतमोजणी

भिवंडी लोकसभा मतदारसंघ : 106 टेबल्सवर 29 फेऱ्यांद्वारे होणार विधानसभानिहाय मतमोजणी

भिवंडी दि.1 जून :

भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सहाही विधानसभा मिळून 12 लाख 50 हजार 76 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. याची मतमोजणी कल्याण – पडघा मार्गावरील के.यू.डी. कंपाउंड याठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून केली जाणार आहे.
त्यासाठी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.(Bhiwandi Lok Sabha Constituency: Assembly wise counting of votes will be held on 106 tables)

विधानसभानिहाय प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी …
मतमोजणीच्या दिवशी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 आणि मुरबाड विधानसभा मतदारसंघ अंतर्गत 21 टेबल लावण्यात येणार आहेत. तर टपाली मतदान मतपत्रिका मोजणीकरता एकूण 14 टेबल, अत्यावशक सेवेतील कर्मचारी आणि गृह मतदान मतमोजणीसाठी 1 अशा एकूण 106 टेबलवर मतमोजणी होणार आहे.

4 हजार 389 टपाली मतपत्रिका…
टपाली मतपत्रिकेची मतमोजणी ही सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार कोष्टी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्या अधिपत्याखाली टपाली मतपत्रिकेचे मोजणी होणार आहे. यामध्ये गृह मतदान, दिव्यांग मतदान, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचे एकूण 4 हजार 263, मतदान आहे, तर सर्विस वोटरची संख्या 116 अशा एकूण 4 हजार 389 टपाली मतपत्रिका मतमोजणी करण्यात येणार आहे.

मतदानाच्या होणार 22 ते 29 फेऱ्या…
ही मतमोजणी संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली होणार आहे. अशाप्रकारे एकूण 106 टेबल्सवर मतमोजणी करण्यात येणार असून भिवंडी ग्रामीणची 25 फेऱ्या, शहापूरची 24 फेऱ्या, भिवंडी पश्चिमची 22 फेऱ्या, भिवंडी पूर्वेची 23 फेऱ्या, कल्याण पश्चिमेची 29 आणि मुरबाड विधानसभेच्या मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत. जास्तीत जास्त मतदानाच्या एकूण २९ फे-या होणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती…
दुपारी चार वाजेपर्यंत मतमोजणी चालण्याचा अंदाज आहे. प्रत्येक मतमोजणी टेबलवर मतमोजणीकरता एक निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक शिपाई, केंद्रीय सूक्ष्म निरीक्षक यांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे दोन निरीक्षकांची नियुक्ती या मतमोजणीकरता करण्यात आलेली आहे.

कर्मचारी वर्गाचे रँडेमायझेशन…
केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्यामार्फत सकाळी सहा वाजता मतमोजणी कर्मचारी वर्गाचे रँडेमायझेशन होणार आहे. भिवंडी लोकसभेच्या 6 विधानसभा मतदारसंघात एकूण 12 लाख 50 हजार 76 जणांचे मतदान झाले आहे.

550 च्या आसपास अधिकारी कर्मचारी…
मतमोजणीकरिता निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच सर्व सहाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह 550 अधिकारी – कर्मचारी (पोलीस स्टाफ वगळून) वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. तर साडेपाचशेच्या आसपास पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात असणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेरही पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी कोणालाही मोबाईल घेऊन जाता येणार नाही. निवडणूक प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी केले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा