Home कोरोना नव्या निर्बंधांबाबत कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम; दुकाने बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांचा विरोध

नव्या निर्बंधांबाबत कल्याण डोंबिवलीतील व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम; दुकाने बंद ठेवण्याला व्यापाऱ्यांचा विरोध

 

कल्याण डोंबिवली दि.6 एप्रिल :
वाढत्या कोवीड रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार कल्याण डोंबिवलीतही काल रात्रीपासून कठोर कोवीड निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र हे निर्बंध घालताना शासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची सुस्पष्टता नसल्याने कल्याण डोंबिवलीतील व्यापारी वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये काही ठिकाणी दुकाने सुरू होती तर काही ठिकाणी बंद असल्याचे दिसून आले.

रविवारी संध्याकाळी वाढत्या कोवीड संख्येला आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून कठोर निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यावेळी शनिवार आणि रविवार पूर्णपणे बंद (विकेंड लॉकडाऊन) आणि आठवड्याचे इतर दिवस निमनुसार दुकाने सुरू ठेवण्याचे राज्य शासनातर्फे तोंडी सांगण्यात आले. मात्र ज्यावेळी लेखी आदेश (जीआर) निघाले त्यांनी मात्र व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. अशातच केडीएमसी प्रशासनाकडूनही राज्य शासनाच्या आदेशानुसार मग सोमवारी रात्री नविन कोवीड निर्बंध जाहीर करण्यात आले. त्यातही राज्य शासनाच्याच आदेशांची ‘री’ ओढण्यात आल्याने कल्याण डोंबिवलीकरांच्या संभ्रमात आणखीनच भर पडली. ‘आठवड्यातील सोमवार ते शुक्रवारपर्यंत सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी’ असा काहीसा व्यापारी आणि नागरिकांचा समज झाला होता. मात्र त्याची आणखी व्यवस्थित खातरजमा केली असता मंगळवारपासून केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकानांनाच उघडण्यास परवानगी देण्यात आल्याचे केडीएमसी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

शासनाला जर अत्यावश्यक वगळता सर्व दुकाने बंद ठेवायची होती तर मग शासनाने तसे स्पष्ट आदेश का काढले नाहीत. एवढे गोल गोल फिरवून आदेश काढायची काय आवश्यकता होती? असा संतप्त सवाल काही व्यापाऱ्यांनी एलएनएशी बोलताना उपस्थित केला आहे.

दरम्यान या सर्व गोंधळाच्या परिस्थितीमूळे आज सकाळी कल्याण डोंबिवलीत अनेक ठिकाणी व्यापारी वर्ग आपल्या दुकानाबाहेर गोळा झाला होता. आपले दुकान उघडायचे की नाही या संभ्रमात तो दिसत होता. कल्याण पूर्वेत मात्र अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवत शासनाच्या या निर्णयाचा विरोध केला. कोरोना फक्त आमच्या दुकानातूनच पसरतो का? दुकाने बंद केली तर आम्ही खायचे काय? असा संतप्त सवाल दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी केला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा