Home ठळक बातम्या कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपूलाची निर्मिती – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडण्यासाठी नव्या उड्डाणपूलाची निर्मिती – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

 

कल्याण दि.13 जुलै :
कल्याण पूर्वेतून कल्याण पश्चिमेला येण्यासाठी किंवा शहाडला जाण्यासाठी तिथल्या नागरिकांना बरीच कसरत करत यावे लागते. मात्र त्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी एमएमआरडीए तब्बल 400 कोटी खर्च करून नव्या  उड्डाणपूलाची निर्मिती करणार आहे. कल्याण डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याबाबत एमएमआरडीए आयुक्तांसोबत बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या उड्डाणपूलाला एमएमआरडीए आयुक्तांनी तत्त्वता मंजुरी दिल्याल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

कल्याण-पुणे लिंक रोडवरील विठ्ठलवाडी येथून हा पूल थेट कल्याण पश्चिमेच्या शहाडला जोडणाऱ्या भवानी चौकात उतरणार आहे. त्याचा डीपीआर तयार आहे. त्याची रेल्वेकडून डीएडी मंजूरी आवश्यक आहे. हा पूल तयार झाल्यावर कल्याण पूर्व पश्चिम गाठण्यासाठी होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

महत्वाकांक्षी रिंगरोडच्या कामाला गती…
कल्याण दुर्गाडी ते टिटवाळा रिंग रोड जिथे संपतो त्यापुढे गोवेलीपर्यंत रस्त्याचा डीपीआर आणि टप्पा क्रमांक आठ तयार करण्याच्या सूचना केल्याचे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. त्याचसोबत मोठा गाव ठाकुर्ली ते दुर्गाडी या तिसऱ्या टप्प्याचे 83 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्याने येत्या आठवड्यात निविदा काढणार असल्याचे केडीएमसी प्रशासनाने सांगितले आहे. काटई ते मोठा गाव ठाकुर्ली हा रिंग रोडचा तिसरा टप्पा असून त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया केडीएमसी आयुक्तांनी सुरू करण्याचे निर्देशही एमएमआरडीने दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.

शहाड पुलाचे चौपदरीकरण…
कल्याण-मुरबाड-नगर मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार असून या मार्गावरील वालधूनी पूलाचे चौपदरीकरण झाले आहे. शहाडच्या रेल्वे उड्डाणपूलाचेही चौपदरीकरण करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केल्याचे खा. शिंदे यांनी सांगितले. या कामाचा डीपीआर तयार करण्याचे आदेश एमएमआरडीएने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. डीपीआर तयार झाल्यावर पूलाच्या बांधकामासाठी किती खर्च होईल हे स्पष्ट होणार आहे.

कल्याण मलंग रोडवर नेवाळी नाक्यावरही उड्डाणपूल…

कल्याण मलंग रस्त्याचे रुंदीकरण झाले आहे. हा रस्ता अंबरनाथ शीळ रस्त्यास नेवाळी नाक्यावर जोडतो. नेवाळी नाक्यावरी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्या ठिकाणीही उड्डाणपूल बनवण्याची मागणी आपण या बैठकीत केल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा