Home कोरोना कोवीड रुग्णालयातून 28 वर्षांच्या ‘विशेष तरुणी’ला घरी पाठवताना कोवीड योद्धे झाले भावूक

कोवीड रुग्णालयातून 28 वर्षांच्या ‘विशेष तरुणी’ला घरी पाठवताना कोवीड योद्धे झाले भावूक

डोंबिवली दि.15 मे :

सध्या कोवीड रुग्णालय म्हटलं की रुग्णांसाठी नातेवाईकांची जीवाची घालमेल, डोक्यात असंख्य विचार आणि चेहऱ्यावर चिंतेची काजळी.. असंच काहीसं चित्र गेल्या काही दिवसांपासून दिसतंय. मात्र आज डोंबिवलीतील वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलात यापेक्षा काहीसे वेगळे आणि आनंददायी वातावरण पाहायला मिळाले. निमित्त होते ते एका 28 वर्षीय विशेष तरुणीच्या निरोप समारंभाचे. इथल्या डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर बऱ्याच दिवसांनंतर आज आनंद झळकत होता. तर या तरुणीला निरोप देताना काही जणांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्याचे दिसून आले. (Covid warriors became emotional while sending a 28-year-old ‘special girl’ home from Covid hospital)

डोंबिवलीत राहणारं एक कुटुंब काही दिवसांपूर्वी कोवीड पॉझिटिव्ह आले आणि मग सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील अत्यंत खडतर असा प्रवास. कारण या कुटुंबातील एक 28 वर्षांची तरुणी ही बौद्धिक7 अक्षमता (mentally retired) आणि त्यातही तिला 100 टक्के कोवीडचा संसर्ग. अशा परिस्थितीत या कुटुंबाने उपचारासाठी विविध खासगी रुग्णालयांशी संपर्क साधला. संपूर्ण कुटुंबावर एकाच ठिकाणी उपचार व्हावेत अशी या कुटुंबाची माफक आणि योग्य अपेक्षा होती. मात्र या तरुणीची मानसिक स्थिती आणि तिच्या फुफ्फुसातील 100 टक्के कोवीड प्रादुर्भाव पाहता कोणतेही रुग्णालय त्यांना दाखल करायला तयार नव्हते.

मग या तरुणीच्या भावाने अखेर हताश होऊन मदतीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ट्विट करत मदतीचे आवाहन केले. मग खासदार शिंदे यांनीही मग क्षणाचाही विलंब न करता तातडीने डॉ. राहुल घुले यांच्याशी संपर्क साधत या संपूर्ण कुटुंबाच्या एकत्रित उपचारांची व्यवस्था केली. आणि अखेर डोंबिवलीच्या वै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रिडा संकुलातील कोवीड रुग्णालयात एकाच ठिकाणी या चौघांवर उपचार सुरू झाले.

इतरांवर उपचार करण्यात काही अडथळा नव्हता. मात्र मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणीवर उपचार करण्याचे मोठे आव्हान इथल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांपुढे होते. परंतु इथल्या डॉक्टरांनीही परिस्थितीपुढे हार न मानता आपल्या प्रयत्नांची शिकस्त केली. अक्षरशः डोळ्यात तेल घालून त्यांनी तब्बल 26 दिवस या तरुणीसाठी सर्वस्व पणाला लावत तिला कोरोनाच्या विळख्यातून बाहेर काढले.

तसं पाहायला गेलं तर ही तरुणी इथल्या डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कोणीही लागत नव्हती. मात्र तरीही या 26 दिवसांत त्यांनी अक्षरशः आपल्याच घरातील एका सदस्याप्रमाणे तिची काळजी घेतली. त्यामुळे तिला आज घरी पाठवताना या सर्वांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने पाणावलेल्या पाहायला मिळाल्या.

१ कॉमेंट

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा