Home ठळक बातम्या गीतरामायणाच्या अवीट सुरांमध्ये न्हाऊन निघाले डोंबिवलीकर

गीतरामायणाच्या अवीट सुरांमध्ये न्हाऊन निघाले डोंबिवलीकर

 

श्रीरामनवमीनिमित्त खा. डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजन

डोंबिवली दि.11एप्रिल :
एकीकडे सुप्रसिद्ध निरुपणकार अनघा मोडक यांच्या अत्यंत निर्मळ तसेच संवेदनशील शब्दांतून केले जाणारे गीतरामायणाचे निरूपण आणि सोबतीला रसिकश्रोत्यांच्या थेट काळजाला भिडणारे गीतरामायणाचे अवीट सुर. रामनवमीच्या पावनसंध्येला अशा अनोख्या दुग्धशर्करा सुवर्णयोगाने डोंबिवलीकर रसिकजन मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले. निमित्त होते रामनवमीप्रित्यर्थ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेतर्फे आयोजित गीतरामायण कार्यक्रमाचे. डोंबिवलीच्या फडके रोडवरील अप्पा दातार चौकात झालेल्या या कार्यक्रमाने डोंबिवलीकर कानसेन तृप्त होऊन गेले.

गीतरामायण म्हणजे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांच्या अलौकिक प्रतिभेतून आणि संगीताचे दैवी देणं लाभलेल्या बाबूजी अर्थातच सुधीर फडके या दोघा विभुतींनी घडवलेली अजरामर कलाकृती. गीतरामायणातील प्रत्येक स्वर म्हणजे जणू काही दैवी अंशच. काल असणाऱ्या श्रीराम नवमीनिमित्त डोंबिवलीच्या फडके रोडवरील अप्पा दातार चौकात डोंबिवलीकर या गीतरामायणाच्या सुर वर्षावात अक्षरशः न्हाऊन निघालेले पाहायला मिळाले. श्रीरंग भावे, केतन पटवर्धन, डॉ. राम पंडित, विद्या करलगिकर आणि आदिती प्रभुदेसाई या गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात हा सुवर्ण ठेवा पुन्हा एकदा उलगडून दाखवला. प्रभू श्रीराम आणि सितामाईच्या विविध प्रसंगांचे केलेलं यथार्थ निरूपण आणि गीतरामायणाच्या निर्मितीदरम्यान गदिमा आणि बाबूजी यांना आलेली प्रचिती यांचा अत्यंत सुंदर असा मिलाफ अनघा मोडक यांनी आपल्या लाघवी शब्दांमध्ये वर्णन केला. ज्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झालेली पाहायला मिळाली.

‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती कुश लव रामायण गाती’ या गीतापासून सुरू झालेला हा कार्यक्रम उत्तरोत्तर असा काही रंगला की ऐकता ऐकता आपल्या डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या हेदेखील रसिक श्रोत्यांना कळाले नाही. इतके डोंबिवलीकर रसिकजन यामध्ये तल्लीन आणि एकरूप होऊन गेले होते.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, शहरप्रमुख राजेश मोरे, माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे, नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा