Home ठळक बातम्या ध्येयवेड्या डोंबिवलीकर धावपटूची विश्वविक्रमाला गवसणी

ध्येयवेड्या डोंबिवलीकर धावपटूची विश्वविक्रमाला गवसणी

६१ दिवस कापले दररोज ४५ किलोमीटरचे अंतर

डोंबिवली दि.३१ ऑक्टोबर :
सांस्कृतिक नगरी डोंबिवलीच्या शिरपेचात विश्वविक्रमाच्या माध्यमातून मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. विशाख कृष्णास्वामी या धावपटूने एकसष्ठ दिवस दररोज ४५ किलोमीटरचे अंतर कापत नव्या विश्व विक्रमाची नोंद केली आहे. आज म्हणजेच ६१ व्या दिवशी ही नेत्रदीपक कामगिरी करत डोंबिवलीचे नाव जागतिक पटलावर नेऊन ठेवले आहे. त्याबद्दल आज ढोल ताशांच्या गजरात आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे कौतुक करण्यात आले.

विशाखने असा केला विश्वविक्रम…
डोंबिवलीतील वै. ह.भ. प. सावळाराम महाराज क्रीडासंकुलातील जॉगिंग ट्रॅकवर विशाख दररोज ४१ फेऱ्या मारायचा. तर आपण रोज किती धावतो याची नोंद ठेवण्यासाठी विशाखने जीपीएस प्रणालीचा वापर केला. तर धावण्यावर नियंत्रण राहण्यासाठी पंच नियुक्त करण्यासह एक नोंद वहीही त्याने सोबत ठेवली. डोंबिवली (Dombiwali) पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने १ सप्टेंबर पासून पुन्हा धावणे सुरू केलं. दररोज पहाटे तीन वाजता विशाख डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणं सुरू करायचा. तीन वाजेपासून सुरू झालेलं त्याचं धावणं सकाळी आठ वाजेपर्यंत सुरूच असायचं. अखेर आज त्याने सलग ६१ दिवस धावत याआधी भारतीय धावपटूच्याच नावावर असणारा ६० दिवस धावण्याचा विश्वविक्रम मोडत नव्या विक्रमाची नोंद केली.

विशाख कृष्णस्वामी असे या तरुणाचे नाव असून तो २८ वर्षाचा आहे. डोंबिवली पूर्वेच्या स्टार कॉलनीत तो आपल्या कुटुंबीयांसह राहतो. गेल्या वर्षी बंगळूरू येथे झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत विशाखने दुसरा क्रमांक पटकावला होता. तेव्हापासून धावण्याचा नविन विक्रम करण्याचा चंग त्याने बांधला होता. जो आज त्याने विश्व विक्रम करीत पूर्ण केला असला तरी अजूनही आपण पुढील काही दिवस धावत राहणार असल्याचे विशाखने यावेळी स्पष्ट केले.

विश्वविक्रमी कामगिरीबद्दल विशाखचे मान्यवरांकडून कौतुक…
दरम्यान विशाखच्या या विश्वविक्रमाबाबत डोंबिवलीचे राजकीय नेते राजेश कदम यांनी सर्वप्रथम सर्वांना माहिती करून दिली. तसेच विशाखच्या या प्रयत्नांना प्रोत्साहनही दिले. आज विशाखने विश्वविक्रमी धाव घेतल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी उत्सुक डोंबिवलीकरांनी एकच जल्लोष केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, केडीएमसीचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी त्याचे कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा