Home ठळक बातम्या पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली ठिकठिकाणी जलमय

पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली ठिकठिकाणी जलमय

 

कल्याण – डोंबिवली दि.9 जून :
पहिल्या पावसाला आपल्याकडे विशेषतः युवा वर्गामध्ये विशेष महत्व आहे. ‘पहिला पाऊस..पहिली आठवण’ या सुंदर कवितेच्या ओळींनुसार हा पहिला वहिला पाऊस प्रत्येकासाठी नेहमीच स्पेशल असतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून कल्याण डोंबिवलीकरांसाठी पहिला पाऊस म्हणजे ‘तुंबलेली गटारे आणि रस्त्यावर साचलेले पाणी’ हीच काय ती आठवण बनत चालला आहे.(In the first rain, Kalyan Dombivali is waterlogged in some places)

एकीकडे हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे मान्सूनच्या पावसाचे म्हणजे पहिल्या पावसाचेही आज आगमन झाले. पहाटेपासूनच वरूण राजानेही मग आपल्या नावाला साजेशी दमदार एंट्री करत कल्याण डोंबिवलीकरांना आपल्या आगमनाची दखल घेण्यास भाग पडले. परिणामी कल्याण डोंबिवलीतील नेहमीच्या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावेळीही पाणी साचलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी घरात तर काही ठिकाणी दुकानांमध्ये गटाराचे पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. त्याजोडीला महापालिकेने केलेल्या नालेसफाईच्या दाव्याबाबतही नागरिकांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सकाळी 12 वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये 83.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.

कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, डोंबिवली पूर्व, एमआयडीसी आदी परिसरात पाणी साचल्याच्या घटना घडल्याचे आढळून आले. तर आज सकाळी कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात सोसायटीच्या संरक्षक भिंतींचा भाग कोसळला. नेहमीप्रमाणेच ट्रॅकवर पाणी आल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

अशाप्रकारे यावर्षीच्या पहिल्या वहिल्या पावसामूळे दरवर्षीप्रमाणेच सर्व गोष्टी झाल्या. आणि पहिल्या पावसाच्या कल्याण डोंबिवलीकरांच्या जुन्याच असणाऱ्या पहिल्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा