Home ठळक बातम्या कचरावेचक मुलांकडून आता पर्यावरण रक्षणासाठीही पुढाकार

कचरावेचक मुलांकडून आता पर्यावरण रक्षणासाठीही पुढाकार

झाडं दत्तक घेत केला पर्यावरण रक्षणाचा जागर

कल्याण दि.29 जून :
कल्याणच्या डम्पिंग ग्राउंडवर कचरा वेचणारे हात आता पर्यावरणाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. विशेष म्हणजे ही कचरावेचक मुलं केवळ झाडं लावून थांबली नाहीत तर त्यांनी ही झाडं दत्तक घेत त्यांच्या सुयोग्य संगोपनाचीही काळजी घेत आहेत.

नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अनेकांनी वृक्षारोपण केले खरे. मात्र त्यापैकी काही रोपट्यांची आताची परिस्थिती काय आहे? हा कदाचित संशोधनाचा विषय ठरू शकेल. काही जणांसाठी हा बहुधा तेवढ्या एका दिवसापुरता किंवा केवळ सेल्फी घेण्यापुरताचा कार्यक्रम असावा. या पार्श्वभूमीवर कल्याणच्या पाणबुडे नगर येथील आदिवासी वस्तीत राहणाऱ्या मुलांनी मात्र कोणताही दिखावा न करता अगदी मनापासून हा जागतिक पर्यावरण दिन साजरा केल्याचे दिसून आले. अनुबंध संस्थेच्या माध्यमातून पाणबुडे नगर आदिवासी वस्तीतील मुलांनी आवळा, चिंच, जाम, पेरू, कडुलिंब, लिंबू, सिताफळ आदी प्रकारची झाडं लावली. केवळ झाडं लावून ही मुलं थांबली नाहीत तर ती जगण्यासाठी या झाडांचे पालकत्वही या मुलांनी घेतले आहे. आणि ही जबाबदारी ही मुलं अत्यंत योग्य पध्दतीने पार पाडत असून गेल्या 3 आठवड्यांमध्ये ही झाडं हळूहळू बारसं धरू लागल्याचे दिसत आहे.
मुलांना लहानपणापासून झाडं आणि निसर्गाबाबत गोडी लागण्यासह त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे भानही जागृत करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे अनुबंध संस्थेचे विशाल जाधव यांनी सांगितले.
दरम्यान कधीकाळी कचरा वेचणारे हेच चिमुकले हात आता निसर्गाच्या रक्षणासाठीही पुढे सरसावले आहेत. ही निश्चितच सकारात्मक बाब असून आता खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षण संवर्धणासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा